लक्षवेधी : राजकारणच संकटात!
आज खासदार फुटले, उद्या आमदार, नगरसेवकांचा नंबर लागणारच नाही, याची खात्री नाही. कदाचित त्याची सुरुवात झालीही असेल. या सर्व प्रक्रियेत अदखलपात्र ठरला तो मतदार (Voter) नावाचा ‘प्राणी’!

– बाबासाहेब निमसे
Voter : आज खासदार फुटले, उद्या आमदार, नगरसेवकांचा नंबर लागणारच नाही, याची खात्री नाही. कदाचित त्याची सुरुवात झालीही असेल. या सर्व प्रक्रियेत अदखलपात्र ठरला तो मतदार (Voter) नावाचा ‘प्राणी’!
राज्यातील राजकारणाच्या दुरवस्थेकडे पाहाता निष्ठा, समाजकारण, सर्वसामान्यांसाठी पदाचा उपयोग, विकास, रोजगार, लोकांची काळजी वाहणारे नेते हे शब्दच कुठेतरी गायब झाल्याचा अनुभव सध्या मतदार (Voter) नावाचा ‘दुर्लक्षित’ आणि ‘गृहीत’ धरलेला प्राणी घेत आहे.
मतदाराला प्राणी संबोधण्याचे कारण या परिस्थितीपुढे तो मुका, बहिरा आणि नाईलाजाने आंधळासुद्धा झालेला बघायला मिळतो आहे, हे आहे. निव्वळ सत्तेच्या खेळात त्याला त्याचे रोजचे जगणे महत्त्वाचे आहे.
शाळांची फी, घरचा किराणा, मुलांची लग्न, मुलांचा रोजगार, आजारपण या पलीकडे बघायला (Voter) त्याला ना वेळ आहे, ना त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. म्हणूनच याचा गैरफायदा ज्यांना त्यानेच निवडून दिले ते ‘नेसूचे वस्त्र मुंडाशी बांधून अभिमानाने मिरविणारे नेते’ सर्रास घेताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठे बंड झाले.
अनेक आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आणि भाजपच्या आश्रयाने मूळ शिवसेनेचे मालक झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली. तिला प्रबोधनकार केशव ठाकरे यांचा आशीर्वाद (Voter) होता. त्यामुळे शिवसेना ही ठाकरेंची हे सामान्य माणूस सांगू शकतो; पण येथे मात्र ठाकरे यांची शिवसेना शिंदेंकडे देण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबतही असेच झाले. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीच्या बाबतही हेच घडले.
अगदी विकासाच्या नावाखाली घाऊक पक्षांतरं होताना दिसत आहेत. विरोधी बाकावर बसणार्या अनेक आमदार, खासदारांना मतदारसंघाच्या विकासाचा उमाळा आल्याचे दिसत असून ते एकतर भाजपाबरोबर असणार्या पक्षात किंवा थेट भाजपात जाताना दिसत आहेत. यामागे सांगण्यात येणारे विकासाचे कारण अतिशय तकलादू असून दिल्लीश्वरांची गरज आणि लागलेले सत्तेचे डोहाळे हे प्रमुख कारण आहे. आता दुसर्यांदा शिवसेनेत फूट पडून 6 खासदार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यांनीही विकास हेच कारण दिले आहे. पण ते खरे नाही, हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाही.
‘तो’ भस्मासूर घास घेणारच
ठाकरे यांच्या शिवसेनेचा हात धरून भाजपा महाराष्ट्रात अजगरासारखा पसरला आणि आज शिवसेनेची अवस्था सर्वजण पहात आहेत. ‘तुम्हाला माझे नेतृत्व मान्य नसेल तर मी राजीनामा देतो’ अशी निर्वाणीची भाषा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाने आणली. यासाठी माध्यम एकनाथ शिंदे असले तरी कर्ताकरविता भाजपच आहे, हे लपून राहात नाही.
प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत ही भाजपाची रणनीती राहिलेली आहे. जवळ करून किंवा प्रसंगी जवळ जाऊन मोठा घास घेणे हेच धोरण झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी ही उदाहरणे ठळक असली तरी राज्यातील राजू शेट्टी यांची शेतकरी चळवळ आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची चळवळ ही आणखी काही उदाहरणे आहेत. आज राजू शेट्टी एकटे पडले आहेत.पाशा पटेल, रवी राणा, सदाभाऊ खोत हे सत्तेच्या वळचणीला गेले खरे पण त्यांची ताकद वाढली की कमी झाली हा शोधाचा विषय.
एकेकाळी रिपब्लिकन चळवळीचा दबदबा होता. कोणताही नेता या चळवळीला हात लावण्याचे धाडस करत नव्हता. पण आजची परिस्थिती पाहिली तर तो दबदबाच गायब करून टाकला आहे. कटू असले तरी ते सत्य आहे. मित्राला प्रभावहीन करणे किंवा नष्ट करणे हे जर सातत्याने घडत असेल तर ते शिंदेंची शिवसेना किंवा स्व. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडतील कसे? अजित पवारांच्या निधनानंतर त्या पक्षाची अवस्था वादळात भरकटलेल्या शिडाच्या नावेसारखी झाली आहे. अधून मधून शिंदे यांनाही अपमान गिळून शांत रहावे लागत आहे. म्हणजे सुरुवात झाली आहे. नुकत्याच शिवसेनावासी झालेल्या 6 खासदांनाही ही बाब ध्यानात येत नसेल असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
बलाढ्य सत्ताधिशांसमोर महाविकास आघाडीच्या बॅनरखाली या खासदारांचा विजय ‘पतिव्रतेच्या कपाळावरील ठसठशीत कुंकवासारखा’ होता, पण त्याची माती झाली. आता यांच्या भाळी ‘सिंदळपण’ कायमचे कोरले जाणार. यांना मतदान करणार्या मतदारांनाच यांचे जाणे आवडले नाही यावरून भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येईल.
प्रतिकात्मक प्रेतयात्रा, श्राद्धं घातले जात आहेत. जोडे मारो आंदोलने होत आहेत. यावरून समाजमन आक्रोश करतेय याची जाणीव ठळक होत आहे. काही दिवसांनी सारे शांत झाले असे कदाचित वाटेल; पण राखेखाली धगधगता ‘अंगार’ लपलेला असतो याचा अनुभव संबंधितांना नक्कीच येईल.आक्रोश सुप्त पण धगधगत असतो याची कॉक्रोच पार्टीला मिळालेला प्रतिसाद पाहून खात्री होते.
भाजपात जाणार्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा गाजावाजा फक्त प्रवेशापुरता होतो. नंतर त्यांची कोणीही दखल घेत नाही, ते वळचणीला मुटकूळे करून पडून राहतात, ही सत्यता आहे. तरी प्रवेशासाठी रांगा लागतात, ही आश्चर्याची बाब नाही तर सत्तेची फळे चाखायला मिळावीत यासाठीची आतुरता, भूक आहे. येणार्या काळात शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या बाबतही हेच होणार हे नक्की! कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत वर्चस्व असणार्या कोणत्याही पक्षाला दुसर्याचे वर्चस्व मान्य होणार नाही.
त्यामुळे आज जरी महायुतीत शिवसेना मोठा भाऊ वाटत असली तरी ही सूज कमी करायला भाजपाला वेळ लागणार नाही. घात ठरलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे तसेच अन्य बंडखोरांची उद्धव ठाकरेंबाबतची विधाने पाहिली तर त्यातून राक्षशी महत्त्वाकांक्षा आणि अहंकाराचा दर्प येतो. हे सर्वजण ठाकरे यांना संपविण्याच्या कटाचे सूत्रधार वाटत असले तरी ते फक्त प्यादे आहेत. खरा सूत्रधार पडद्यामागे आहे.






