Voter List: ९० लाख मतदारांची पडताळणी
Voter List:

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान
पुणे – मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण मंगळवारपासून सुरू झाले असून, पुढील महिनाभरात ८ हजार ४१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत.
जिल्ह्यात सुमारे ९० लाख ८६ हजार मतदार असून, या पडताळणीसाठी प्रत्येक मतदाराला दोन अर्ज देण्यात येणार आहेत. एखादा मतदार नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही तात्पुरत्या कारणास्तव घरापासून दूर असेल, तर कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य त्या मतदाराच्या वतीने पडताळणी अर्ज भरू शकतो, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा निवडणूक शाखेतर्फे प्रत्येक मतदान केंद्रासाठी यापूर्वी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला समाविष्ट असलेल्या सर्व मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी घरी जाऊन करावी लागणार आहे.
मतदाराला आपली माहिती एका अर्जावर भरून द्यावी लागणार असून, दुसरा अर्ज पोचपावती म्हणून मतदार आपल्याकडे ठेवू शकणार आहे. या पोच अर्जावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असेल. त्यामुळे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिलेल्या माहिती बदल असल्यास मतदाराला त्यावर आक्षेप घेता येणार आहे.
प्रत्यक्ष पडताळणीनंतरही एखाद्या मतदाराची पडताळणी न झाल्यास संबंधित मतदाराला सुनावणीसाठी नोटीस बजावली जाईल. सुनावणीदरम्यान हा मतदार आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकेल. सुनावणीसाठी प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पाच ते पंधरा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची मदत होणार असून, मतदारांच्या घराजवळ सुनावणी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.





