लक्षवेधी : मुत्सद्दी राजनीतिज्ञ अटलजी

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आज 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून ते आजही लोकांना प्रेरणा देतात.
पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी 1998 मध्ये शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर पडत होता. सुमारे 9 वर्षांत आपण 4 लोकसभा निवडणुका पाहिल्या. भारतातील जनतेचा संयम सुटत चालला होता आणि सत्तेवर येणारी सरकारे कसा कारभार करतील याबाबत लोक साशंक होते. अटलजींनीच स्थिर आणि प्रभावी राज्यकारभार देऊन हा प्रवाह उलट दिशेने वळवत परिस्थिती अनुकूलपणे पालटली. अटलजी स्वतः सामान्य पण सत्शील कुटुंबातून आले असल्यामुळे, सामान्य नागरिकांना करावा लागणारा संघर्ष आणि परिणामकारक राज्यकारभारातून घडवून आणता येऊ शकणार्या परिवर्तनाची ताकद, ते जाणून होते.
आपल्या सभोवतालच्या अनेक क्षेत्रांमध्ये अटलजींच्या नेतृत्वाचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कारकिर्दीत, भारताने माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संपर्क व्यवस्थेच्या जगात मोठी झेप घेतली. अतिशय धडाडीची युवाशक्ती लाभलेल्या आपल्यासारख्या देशासाठी हे विशेष महत्त्वाचे होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने तंत्रज्ञान सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. हे करताना, सोबत भारताला एकत्र जोडण्याची, जवळ आणण्याची दूरदृष्टी होती.
आजही अनेक जण भारतातील मुख्य ठिकाणे चहू दिशांनी जोडणार्या सुवर्ण चतुष्कोन या महामार्ग प्रकल्पाची आठवण काढतात. पंतप्रधान ग्राम सडक योजनेसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक दळणवळण वाढवण्याचे वाजपेयी सरकारचे प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. त्याचप्रमाणे त्यांच्या सरकारने दिल्ली मेट्रोसाठी व्यापक आणि विस्तृत काम करून दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्थेला-वाहतुकीला चालना दिली. दिल्ली मेट्रो प्रकल्प आज जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून जगात वाखाणला जातो. अशा प्रकारे, वाजपेयी सरकारने केवळ आर्थिक विकासालाच चालना दिली असं नाही, तर दूरदूरपर्यंत पसरलेल्या प्रदेशांना जवळ आणले, देशाची एकता आणि एकात्मता वाढवली.
सामाजिक क्षेत्राचा विचार करायचा झाला तर सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम, अटलजींनी कशा प्रकारे एका अशा आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे देशातील सर्वांना विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना आधुनिक शिक्षण उपलब्ध असेल, ते अधोरेखित करतो. त्याच वेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला.
त्यांच्या नेतृत्वाचा दाखला 1998 च्या उन्हाळ्यात घडलेल्या घटनेतून पाहायला मिळतो. त्यांचे सरकार नुकतेच सत्तेवर आले होते आणि 11 मे रोजी भारताने ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखली जाणारी पोखरण अणुचाचणी केली. या अणुचाचणीने भारताच्या वैज्ञानिक समुदायाच्या सामर्थ्याची वेगळी ओळख जगासमोर आणली. भारताने अणुचाचणी केल्याने संपूर्ण जग थक्क झाले आणि त्याच वेळी काही देशांनी याबद्दल विनाकारण आपल्या संतापाचे देखील प्रदर्शन केले.
यावेळी एखाद्या सामान्य नेत्याने कच खाल्ली असती, पण अटलजी हे वेगळ्या मातीतून घडलेले नेते होते. पुढे काय झाले? भारत खंबीर राहिला आणि दोन दिवसांनी 13 मे रोजी आणखी चाचण्या करण्याचे आदेश देत सरकारने आपला निर्धार दाखवून दिला. 11 मे रोजी झालेल्या चाचण्यांनी वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवले तर 13 मे रोजी केलेल्या चाचण्यांनी खर्या नेतृत्वाचे दर्शन घडवले. हा संपूर्ण जगाला दिलेला एक संदेश होता की आता ते दिवस मागे पडले आहेत ज्यावेळी भारत कोणत्याही इशार्याखाली किंवा दबावाखाली येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही तत्कालीन वाजपेयी सरकार, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराचे आणि त्याच वेळी जागतिक शांततेचा भारत खंदा पुरस्कर्ता असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
भारतीय लोकशाहीचे अटलजींना ज्ञान होते आणि ती अधिक भक्कम करण्याची त्यांना जाणीव होती. भारतीय राजकारणातील आघाड्यांची व्याख्या बदलणार्या रालोआचे अध्यक्षपद अटलजींनी भूषवले. त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि रालोआला विकासाचे, राष्ट्रीय प्रगतीचे आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षांचे सामर्थ्य बनवले. त्यांच्या राजकीय प्रवासातून त्यांची संसदीय प्रतिभा दिसून येते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा बराच काळ त्यांनी विरोधी बाकांवर व्यतीत केला होता; पण त्यांनी कधीही कोणा विरोधात मनात कडवटपणा ठेवला नाही.
संधिसाधू डावपेचांचा वापर करून सत्ता मिळवण्याची हाव त्यांना कधीही नव्हती. 1996 मध्ये घोडेबाजार आणि घाणेरड्या राजकारणाच्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य मानले. 1999 मध्ये केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला. अशा प्रकारच्या अनैतिक राजकारणाला आव्हान देण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला, मात्र त्यांनी नियमांना अनुसरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी जनतेनेच त्यांना पुन्हा एकदा सत्तेवर आणले.
अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृती किती खोलवर रुजलेली होती, याचाही दखलपूर्ण उल्लेख आपण करायलाच हवा. ते जेव्हा भारताचे परराष्ट्रमंत्री झाले, त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभांमध्ये हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले होते. त्यांच्या या कृतीतून भारताचा वारसा आणि अस्मितेबद्दलचा त्यांचा अपार अभिमान दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या पैलूने जागतिक पटलावर स्वतःचा अमिट ठसाही उमटवला आहे.
अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे कोणालाही आपल्याकडे अगदी सहजपणे आकर्षून घेणारे होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य आणि अभिव्यक्ती प्रेमाने त्यांचे अवघे जीवन समृद्ध झाले होते. आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी आणि कधी तर सहवेदना व्यक्त करण्यासाठी केला. त्यांच्या असंख्य काव्यरचनांमध्ये तर त्यांच्या मनातील संघर्षाचे आणि राष्ट्राविषयीच्या आशांचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते. म्हणूनच तर त्यांच्या काव्यरचना आजही सर्व वयोगटातील लोकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे तर हे भाग्यच होते की आम्हाला अटलजींसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून शिकता आले, त्यांना जाणून घेता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. भाजपासाठी त्यांनी दिलेले योगदान हे खर्या अर्थाने आधारभूत असे मोलाचे योगदान होते. काँग्रेसला सशक्त पर्याय उभा करणे आणि त्या पर्यायाचे नेतृत्व करणे यातूनच त्यांची थोरवी कळून येते.
त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आदर्शाची जाणीव जिवंत ठेवण्यासाठी आणि भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा झोकून देऊया. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्याला उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे आणि देत राहील.





