रामटेकडी येथे आटोमॅटिक टँकर पॉईंटवरून लाखो लिटर पाणी वाया

हडपसर : हडपसर -रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याच्या टँकर भरून देण्यासाठी महापालिकेने दहा ते अकरा पॉईंट उपलब्ध करून दिलेले आहेत. या आटोमॅटिक टँकर पॉईंटवरून पाणी भरताना अनेकदा वाया जात आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या पॉईंटमधूनच लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टॅंकर भरून झाल्यानंतर येथून पाण्याचे पाट वहात आहेत. ज्यामुळे रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे ही पडले आहेत. वाहणाऱ्या पाण्याचा वेग मोठा असल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे.
हडपसर उपनगर आणि समाविष्ट गावांत एकीकडे पाण्यासाठी लोकांची फरपड सुरु आहे, तर दुसरीकडे लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेत समाविष्ट केलेल्या केशवनगर, साडेसतरानळी, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी आणि इतर वाड् वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अपेक्षेप्रमाणे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होत नाहीत. हडपसरमध्येही अनेक भागात पाणीटंचाई आहे. असं असताना महापालिकेने पाण्याच्या टँकरसाठी उपलब्ध करून दिलेल्या पॉइंटमधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी आटोमॅटिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, अनेकवेळा टॅंकर भरून झाल्यानंतर तसेच झाकण नसलेल्या टँकर मधून पाणी वाया जात आहे. या पॉईंटवरून पाण्याचा प्रवाह रस्त्यावर वाहत असून रस्ता पूर्णपणे उखडला आहे. वाया जाणारे पाणी पुढे थेट पावसाळी ड्रेनेज लाईनमध्ये जाताना दिसत आहे. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
येथील टँकर पॉईंटवरून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याशिवाय अनेक टँकरला झाकणे नसल्याने पाणी वाहून नेताना टँकर मधूनही पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल इस्टेट मधील अनेक रस्ते मोठ -मोठे खड्डे पडून खराब झाले आहेत. या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागत आहे.
रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे असलेला पाणी भरणा टँकर पॉईंट हा पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीमने जोडलेला आहे. त्यामुळे तसे पाणी वाया जाण्याचे कारण नाही. परंतु, टँकरचे झाकण बंद नसल्यास किंवा टँकर हिंदकळून काही प्रमाणात पाणी वाया जात असल्यास संबंधित ठेकेदारांना त्याबाबत सूचना देण्यात येतील. येथील पाणी टँकर पॉइंटमधून पाण्याची अजिबात नासाडी होणार नाही याबाबत तातडीने उपयोजना केल्या जातील.
इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग





