Lakhewadi Theft – इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील मानेमळा परिसरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री धाडसी घरफोडी करत सुमारे ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नागेश महादेव माने (वय ३५, रा. लाखेवाडी, मानेमळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ८ या कालावधीत ‘माऊली गारमेंट अॅण्ड फुटवेअर’ या दुकानात चोरी झाली. चोरट्याने दुकानाच्या वरच्या बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली. या घरफोडीत ३० हजार रुपयांच्या जिन्स पँट, १ लाख ३६ हजार रुपयांच्या साड्या, ३० हजार रुपयांचे शर्ट, १० हजार रुपयांच्या चप्पला, १५ हजार रुपयांचे बूट, १ लाख २५ हजार रुपयांचे लहान मुलांचे कपडे, १६ हजार रुपयांचे कापड, ३३ हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर व हार्डडिस्क तसेच २,५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३,९७,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. विशेष म्हणजे, चोरट्याने सीसीटीव्ही यंत्रणेलाच लक्ष्य करत डीव्हीआरसह हार्डडिस्क चोरून नेल्याने ही चोरी पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चोरट्याला दुकान व परिसराची माहिती असावी, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत असून प्रभारी पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.