Crime News : शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या, नेमकं काय घडलं?
Crime News : या घटनेनंतर आरोपी गावातून मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचेही समोर आले आहे.

न्हावरे : निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास निमोणे गावाच्या हद्दीतील घोडनदीच्या पात्रात फिर्यादी दत्तात्रय नानासो काळे यांनी शेतासाठी पाणी अडविण्याच्या उद्देशाने बांध घातला होता. मात्र संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे आणि समीर प्रकाश शेलार यांनी मोटारसायकलवर येऊन तो बांध फोडल्याचा आरोप आहे.
याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ अक्षय काळे आरोपींकडे गेले असता वाद चिघळला. यावेळी संकेत काळे आणि शुभम काळे यांनी दत्तात्रय व अक्षय काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत डोके, तोंड, छाती व पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर समीर शेलार यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर आरोपी गावातून मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचेही समोर आले आहे. “आम्ही जेलमध्ये राहून आलो आहोत, आम्ही कोणालाही घाबरत नाही, आमच्या नादाला लागणाऱ्याची गय करणार नाही,” अशा शब्दांत आरोपींनी गावकऱ्यांना धमकावल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.
दोन तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु केली. दरम्यान, आरोपी गोलेगाव-करडे रोड परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने कारवाई करत संकेत ज्ञानदेव काळे (वय 26) आणि समीर प्रकाश शेलार (वय 23) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींवर आधीच 12 गंभीर गुन्हे
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर यापुर्वी दरोडा, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर मारहाण, जखमी करणे यांसारख्या गंभीर स्वरुपाचे एकूण 12 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, अंबादास थोरे, नीरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी केली आहे.





