Beed Police : आठ वर्षांनी लेक परतला ! आई-वडिलांसह कुटुंबाची भावनिक भेट; बीड पोलिसांचं ‘फिल्मी’ सरप्राइज

बीड : शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्यामुळे 2017 मध्ये रागाच्या भरात घर सोडून गेलेला राजू माळी तब्बल आठ वर्षांनी सापडला आहे. बीड पोलिसांनी अथक प्रयत्न करत त्याचा शोध घेतला आणि त्याच्या आई-वडिलांना ‘फिल्मी स्टाइल’ सरप्राइज देत कुटुंबाची भावनिक भेट घालून दिली.
राजू माळी हा 2017 मध्ये, वयाच्या 16 व्या वर्षी, नाळवंडी येथे शिक्षण घेत असताना घरातून निघून गेला होता. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर असून, त्यांनी आणि नातेवाइकांनी सहा वर्षे राजूचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. 2023 मध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. अखेर दोन वर्षांच्या शोधानंतर राजू पुण्यात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला शोधून काढले.
पोलिसांनी राजूच्या आई-वडिलांना आणि आजोबांना तपासासाठी बीडला बोलावले. चौकशीच्या नावाखाली त्यांना सरप्राइज देत राजूला अचानक समोर आणले. ओळख पटताच राजू आणि त्याची आई एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. हा भावनिक क्षण उपस्थित सर्वांचे डोळे पाणावणारा होता.
राजूने घर सोडल्यानंतर पुण्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी केली, नंतर वेल्डिंग शिकून गुजरातला गेला. आठवड्याभरापूर्वी तो पुण्यात परतला असताना पोलिसांनी त्याला गाठले आणि बीडला आणले. बीड पोलिसांच्या या संवेदनशील आणि यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





