Laikey Laika First Poster: महाफ्लॉप डेब्यूनंतर राशा थडानी पुन्हा सज्ज; ‘लाइकी-लाइका’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

Laikey Laika First Poster: ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडन यांची मुलगी राशा थडानी हिने २०२५ मध्ये आलेल्या ‘आजाद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, ८० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि अपेक्षित यश मिळवू शकला नाही. या महाफ्लॉप डेब्यूनंतर आता राशा थडानी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडण्याच्या तयारीत आहे.
राशा थडानीची नवी फिल्म ‘लाइकी-लाइका’ याची घोषणा जून २०२५ मध्ये करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा पहिला अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राशासोबत अभिनेता अभय वर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
पोस्टरने वाढवली उत्सुकता
‘लाइकी-लाइका’च्या पहिल्या पोस्टरमध्ये मुख्य कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. पोस्टरमध्ये प्रतीकं आणि टेक्स्चरच्या माध्यमातून चित्रपटाचा मूड दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका जुन्या, खराब भिंतीसमोर दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभ्या असल्याचं चित्र दिसतं, मात्र फक्त त्यांचे पाय आणि बूटच दाखवले आहेत. हा पोस्टर पाहून हा चित्रपट केवळ रोमँटिक नसून त्यात आणखी काही वेगळं पाहायला मिळणार असल्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
२०२६ मध्ये होणार प्रदर्शित
पोस्टर समोर आल्यानंतर या अनोख्या लव्हस्टोरीबाबत चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटात रोमँससोबत तीव्र भावना आणि वेगळा आशय पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘लाइकी-लाइका’ हा चित्रपट उन्हाळा २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याची नेमकी रिलीज तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अभय वर्मा आणि राशा थडानी यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असणार आहे. पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर ‘लाइकी-लाइका’ हा राशा थडानीच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.



