Ladkiadki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चा फॉर्म भरताना महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं? पाहा…..

Ladkiadki Bahin Yojana | Anganwadi Worker : राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या गावोगावच्या अंगणवाडी सेविका घरोघरी फिरून ‘नारी दूत’ या ॲपवरून फॉर्म भरत आहेत.
मात्र, अश्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगाव मधील अंगणवाडी क्रमांक 1 च्या सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. सुरेखा रमेश आतकरे (वय 48) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सुरेखा आतकरे या शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शासनाकडून निराधार झालेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा आतकरे या अंगणवाडी सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र आला. सुरेखा आतकरे खुर्चीवरून खाली कोसळल्या. अंगणवाडी मधील मदतनीस या किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या.
जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खूर्ची वरून खाली निपचीत पडल्याचे मदतनीसला दिसले. सुरेखा आतकरे यांना तत्काळ मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शासकीय डॉक्टरांनी तपासणी करून सुरेखा आतकरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
लाडकी बहीण योजनेची माहिती :
१) सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.
तसंच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.
३) सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६) रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.
७) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना, पाहा….
ही योजना 21 ते 60 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. आजपासून या योजेनच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे.





