Ladki Bahini Yojana : “पात्रता-अपात्रता तपासणे हा प्रक्रियेचा भाग” – आदिती तटकरे

मुंबई – शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला नाही. तसेच त्यांच्याकडे संपर्क करुन आम्ही माहिती मागवलेली नाही. सुमारे साडेचार महिला आत्तापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतला आहे. तसेच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत. तसेच या योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या, सरकारची कुठलीही योजना असू द्या. विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होत असतेच. संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता-अपात्रता दरवर्षी तपासली जाते. सिलिंडर सबसिडी योजनेचेही तसेच आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता-अपात्रता तपासली जाणे ही नित्य नियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखी आहे. यात काहीही नवीन नाही. योजना नवी असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आहे, असे त्यांनी म्हटले.
आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेला एक वर्षही झालेले नाही. त्याबद्दलचे काही समज पसरवले जात आहेत. आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही. ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी सांगितले की आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही असे सांगितले असेल तर हा वेगळा भाग झाला. अशाच महिलांचे लाभ परत घेतले गेले आहेत. तसेच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. योजनेचे मूल्यमापन होतच असते. ही माहिती रोज बदलत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.





