Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे सर्व्हर डाऊन; महिला वर्गातून आणखी मुदतवाढ देण्याची मागणी

Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी वंचित महिलांसाठी मुदतवाढ दिली. मात्र या योजनेचे सर्व्हर काही दिवसांपासून डाऊन असल्याने अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच फक्त अंगणवाडी सेविकांकडे अर्ज नोंदणी होत असल्याने महिलांची त्रेधातिरपट उडत आहे. यासाठी अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून कार्यान्वित केली. यासाठी मोबाईल अॅप व संगणकाद्वारे ऑनलाईन नोंदणीचा पर्याय देण्यात आला.
त्यासाठी या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पाच महिन्यांचे प्रत्येकी साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली व नोंदणीचे अधिकार अंगणवाडी सेविकांना देण्यात आले.
या योजनेचे अनुदान हे आधारप्रमाणे सोडण्यात आल्यामुळे बहुसंख्य महिलांचे खाते आधार लिंक असतानासुद्धा अन्यत्र उघडण्याची सूचना दिल्यामुळे बहुसंख्य महिलांना पुन्हा या संदर्भात पोस्टात खाते उघडावे लागले.
ऐन दसरा सणात हे पैसे महिलांच्या खात्यावर आल्यामुळे महिलांना ते उपयोगी पडले तर या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्यामुळे महिलांनी त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर चार दिवसांपूर्वी या योजनेसाठी १५ ऑक्टोबरची मुदत शासनाने जाहीर केली होती.
अंगणवाडी सेविकांनाही मन:स्ताप
या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे सर्व्हर बंद असल्यामुळे अनेक महिला या नव्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या. तर सर्व्हर डाऊनसाठी अंगणवाडी सेविकांना देखील मन:स्ताप सहन करावा लागला.
आलेल्या अर्जांचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा राहिला त्यामुळे वंचित महिलांना शासन मुदतवाढ देणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
या योजनेसाठी महिन्यापूर्वी नोंदणी करून देखील अद्याप ज्या महिलांच्या खात्यावर अनुदान जमा नाही त्या महिलांचे अनुदान तातडीने जमा करावे. वंचित महिलांना लाभ मिळावा म्हणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.





