ladakh protest : “पंतप्रधान मोदींकडून लडाखचा विश्वासघात”; कॉंग्रेसचा जोरदार हल्लाबोल !

नवी दिल्ली – लडाखमधील स्थितीवरून कॉंग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. मोदींनी लडाखमधील जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप त्या पक्षाने केला. लडाखच्या लेहमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ४ आंदोलक मृत्युमुखी पडले. त्यामध्ये माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचाही समावेश आहे.
त्यांच्या मृत्यूचा संदर्भ देऊन कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारला घेरले. खर्गे आणि राहुल या दोघांनीही थारचिन यांच्या प्रमाणेच माजी सैनिक असणाऱ्या त्यांच्या व्यथित वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला.
पिता आणि पुत्र अशा दोघांनीही लष्करात सेवा केली. त्यांच्या रक्तातच देशभक्ती आहे. तसे असूनही केंद्र सरकारने देशाच्या वीरपुत्राचा गोळी झाडून जीव घेतला. केवळ लडाख आणि स्वत:च्या हक्कांसाठी वीरपुत्र उभा राहिल्याने तसे घडले. देशसेवेचे हेच बक्षीस आहे का, असा प्रश्न व्यथित वडिलांचे डोळे विचारत आहेत.
लडाखमधील जीवितहानीची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी व्हावी. दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी आमची मागणी आहे. लडाखची जनता आपले हक्क मागत आहे. त्यांच्याशी संवाद साधला जावा. हिंसेचे आणि धाकदपटशाचे राजकारण बंद केले जावे, अशी अपेक्षा राहुल यांनी व्यक्त केली.
तर, लडाखचे दु:ख संपूर्ण देशाचे असल्याची भावना खर्गे यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात २० भारतीय जवानांनी वीरमरण पत्करले. त्यानंतर स्वत: मोदींनी चीनला क्लीन चिट दिली. तसे करणारे थारचिनसारख्या वीरांच्या हौतात्म्याचा काय मान ठेवणार? भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.





