Kylian Mbappe WC Record : फिलाडेल्फियातील वादळात किलियन एम्बाप्पेचा महाविक्रम! इराकचा धुव्वा उडवत फ्रान्स बाद फेरीत; रोनाल्डोला टाकलं मागे
Kylian Mbappe WC Record : किलियन एम्बाप्पेने फुटबॉल इतिहासातील अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड्स उद्ध्वस्त करत विश्वविक्रमी इतिहास रचला आहे.

Kylian Mbappe 16 FIFA World Cup Goals Record : फिलाडेल्फियामध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि तब्बल दोन तास खोळंबलेला सामनाही फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पेची गोल करण्याची भूक रोखू शकला नाही. फिफा विश्वचषकातील इराकविरुद्धच्या सामन्यात एम्बाप्पेने दोन अद्भूत गोल डागत फ्रान्सला ३-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला. या विजयासह फ्रान्सने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर एम्बाप्पेने फुटबॉल इतिहासातील अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड्स उद्ध्वस्त करत विश्वविक्रमी इतिहास रचला आहे.
१०० व्या सामन्यात पराक्रम; मिरोस्लाव क्लोझच्या विक्रमाशी बरोबरी – (Kylian Mbappe WC Record)
२७ वर्षीय एम्बाप्पेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात हा ऐतिहासिक टप्पा गाठला. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला एम्बाप्पेने बॉक्सच्या बाहेरून एक अचूक शॉट मारत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर आलेल्या भीषण वादळामुळे मध्यंतराचा (हाफटाईम) ब्रेक तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ लांबला.सामना पुन्हा सुरू झाल्यावर ५४ व्या मिनिटाला इराकच्या डिफेंडरच्या चुकांचा फायदा घेत उस्मान डेम्बेलेने पास दिला आणि एम्बाप्पेने दुसरा गोल डागला.
🇫🇷⚡#France 3–0 #Iraq, #Mbappe survived a biblical storm and still managed to be the only real lightning in Philadelphia with two goals.
👽#Kylian moved to 16 goals in just 16 #WorldCup matches.
📊The #RealMadrid superstar now has 60 goals for #LesBleus in only 100 appearances. pic.twitter.com/y6cFWPuNIq
— CGTN Sports Scene (@CGTNSportsScene) June 23, 2026
या गोलसह एम्बाप्पेचे विश्वचषकातील एकूण १६ गोल झाले आहेत. त्याने ब्राझीलच्या दिग्गज रोनाल्डोला (१५ गोल) मागे टाकत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझच्या (१६ गोल) विक्रमाशी बरोबरी केली आहे. फ्रान्ससाठी तिसरा गोल बॅलन डी’ऑर विजेता उस्मान डेम्बेलेने केला. एम्बाप्पे, डेम्बेले आणि डिझायर डुए या त्रिकुटाने फ्रान्सला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार का मानले जाते, हे पुन्हा सिद्ध केले.
आता फक्त लिओनेल मेस्सी पुढे – (Kylian Mbappe WC Record)
फिफा विश्वचषक इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या (१८ गोल) नावावर आहे. मेस्सीनेही याच दिवशी दोन गोल करत अव्वल स्थान पटकावले आहे. एम्बाप्पे आता १६ गोलसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर असून तो मेस्सीपेक्षा अवघा दोन गोल मागे आहे. एम्बाप्पेने २०१८ मध्ये ४ गोल, २०२२ मध्ये ८ गोल (गोल्डन बूट) आणि चालू विश्वचषकात आतापर्यंत ४ गोल केले आहेत. तसेच, ६ वेगवेगळ्या विश्वचषक सामन्यांमध्ये २ किंवा त्याहून अधिक गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.





