England Football Team : फिफा विश्वचषकात अमेरिकेत सर्वात मोठी सुरक्षा त्रुटी! इंग्लंडच्या फुटबॉल संघाचे कस्टमाइज्ड शूज आणि बॉल्सची चोरी
England Football Team : अमेरिकेत दाखल झालेल्या बलाढ्य इंग्लंड फुटबॉल संघाचे कस्टमाइज्ड मॅच बूट्स (शूज), अधिकृत मॅच बॉल्स आणि ट्रेनिंग किट्सची भररस्त्यात चोरी झाली आहे.

England Football Team Shoes Socker Balls Stolen : अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू असलेल्या ‘फिफा विश्वचषक २०२६’च्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगत असतानाच, मैदानाबाहेरून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. अमेरिकेत दाखल झालेल्या बलाढ्य इंग्लंड फुटबॉल संघाचे (England Football Team) कस्टमाइज्ड मॅच बूट्स (शूज), अधिकृत मॅच बॉल्स आणि ट्रेनिंग किट्सची भररस्त्यात चोरी झाली आहे. या अजब चोरीमुळे जागतिक फुटबॉल वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अमेरिकेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फ्लोरिडाहून कॅन्सस सिटीला जाताना घडली घटना –
ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ फ्लोरिडामध्ये आपला सराव कॅम्प करत होता. हा कॅम्प संपवून संघ फ्लोरिडाहून कॅन्सस सिटी येथील ‘स्वोप सॉकर व्हिलेज’ बेस कॅम्पसाठी रवाना झाला. खेळाडू विमानाने सुरक्षित पोहोचले, मात्र त्यांचे साहित्य आणि महागडे सामान घेऊन जाणारे वाहन चोरांच्या रडारवर आले.
हे वाहन जेव्हा कॅन्सस सिटीत पोहोचले, तेव्हा गाडीतील बॉक्स उघडे पाहून व्यवस्थापन चक्रावून गेले. चोरांनी गाडीतून खेळाडूंचे खास कस्टमाइज्ड बूट्स, अधिकृत फिफा मॅच बॉल्स आणि किट्स पळवले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चोरांनी त्या वाहनात फक्त एकच फुटबॉल शिल्लक ठेवला होता.
पोलीस अॅक्शनमध्ये; दोन संशयित ताब्यात –
या हाय-प्रोफाइल चोरीनंतर कॅन्सस सिटी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासाला वेग आला असून आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इंग्लंड फुटबॉल असोसिएशन (FA) देखील स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात असून सामान परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
१७ जूनच्या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी कोंडी –
ग्रुप ‘L’ मध्ये असलेल्या इंग्लंडचा पहिला हायव्होल्टेज सामना बुधवार, १७ जून रोजी डलास येथे क्रोएशियाविरुद्ध होणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच मुख्य खेळाडूंचे शूज चोरीला गेल्याने मुख्य प्रशिक्षक थॉमस टुशेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या व्यवस्थापन खेळाडूंसाठी पर्यायी बूट्स आणि किट्सची व्यवस्था करत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच फ्लोरिडातील इंग्लंडच्या कॅम्पजवळ गोळीबाराची घटना घडली होती, त्यानंतर आता थेट चोरी झाल्याने संघ चिंतेत आहे.





