Kumbharwada: पणत्या-कंदिलांनी सजला कुंभारवाडा; कलकत्ता पणत्यांसह रंगीत, डिझायनर दिव्यांना पसंती
Kumbharwada : वाढत्या खर्चामुळे दरातही वाढ

पिंपरी – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कुंभारवाड्यात पणत्या, मातीचे कंदील, आकर्षक दिवे बनविण्याची लगभग सुरू आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच रंगीत, आकर्षक आणि विविध आकारांतील डिझायनर पणत्यांनी बाजारपेठ सजली आहे.
घराची सजावट, लक्ष्मीपूजन आणि भेटवस्तूंसाठी नागरिकांकडून विविध प्रकारच्या पणत्या खरेदी केल्या जात आहेत. बाजारात पारंपरिक पणत्यांपासून ते आधुनिक सजावटीच्या दिव्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः कलकत्ता पद्धतीने तयार केलेल्या घराच्या आकारातील पणत्या, पावलांच्या आकारातील पणत्या, विठ्ठलाच्या प्रतिमेच्या पणत्या आणि सुपली पणत्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
याशिवाय रंगीत पणत्या, लक्ष्मीपूजनासाठी लागणारी बोळकी, समयी दिवे, झाकणाचे दिवे आणि काचेचे दिवेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. डिझायनर पणत्यांमध्ये सुमारे १०० ते १५० प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांना आवडीनुसार खरेदी करता येत आहे.
एक आणि पाच दिव्यांची हँगिंग सजावट तसेच विविध रंगांतील मातीचे कंदील घराच्या सजावटीसाठी आकर्षण ठरत आहेत. दोन, चार आणि सहा पणत्यांचे आकर्षक संच भेटवस्तू म्हणून देण्यासाठीही उपलब्ध आहेत. त्यामुळे पारंपरिक दिव्यांना आधुनिक सजावटीची जोड मिळाली आहे.
कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने पणत्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शंभर पणत्यांमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, पूर्वी २०० रुपयांना मिळणाऱ्या काही प्रकारच्या पणत्यांचे दर आता २५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
मात्र, बाजारात पणत्यांचा पुरेसा साठा असल्याने दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी गरज आणि बजेटचा विचार करून खरेदी करत आहेत.
मातीच्या पणत्यांची परंपरा कायम
स्टील आणि मेणाच्या दिव्यांचे पर्याय उपलब्ध असतानाही मातीच्या पणत्यांची मागणी कायम आहे. तेल संपल्यानंतर पुन्हा तेल भरून या पणत्या वापरता येत असल्याने त्यांची उपयुक्तताही टिकून आहे. परंपरा, पूजाविधी आणि घराच्या सजावटीसाठी मातीच्या पणत्यांना आजही विशेष महत्त्व आहे.
‘कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे पणत्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शंभर पणत्यांमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात मालाची उपलब्धता चांगली असल्याने दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे.’- सारिका कुंभार, विजय आर्ट्स
Wakad News: वाकडमध्ये मध्यरात्री भीषण आग; कोट्यवधींचा ऐवज जळून खाक





