श्रीलंकेत हजारोंच्या उपस्थितीत पार पडला कुंभाभिषेकम; सीता अम्मान मंदिरात धार्मिक सोहळा

कोलोंबो, (श्रीलंका) – श्रीलंकेतील सीता अम्मान मंदिरात आज बहुचर्चित कुंभाभिषेकम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या धार्मिक विधीला प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जगभरातील भाविकांनी सीता अम्मान मंदिरात गर्दी केली होती.
समारंभाच्या केंद्रस्थानी कुंभभिषेकम नावाचा विधी आहे. हा विधी म्हणजे मंदिराच्या पवित्र परिसरामध्ये दैवी शक्तींच्या नूतनीकरणाचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुण्यांमध्ये श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या पवित्र मेळाव्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.
सीता अम्मान मंदिर, सीता एलिया या शांत आणि निसर्गर्मय गावात वसलेले आहे. देवी सीतेला रावणाने ठेवले होते ते हे ठिकाण असल्याचे मानले जाते. त्यामुळे या स्थानाला पौराणिक महत्त्व आहे. सोहळ्याचे पावित्र्य वाढविण्यासाठी, अयोध्येतून सरयू नदीच्या पाण्याने भरलेले पाच कलश विधीपूर्वक आणण्यात आले होते.
या पवित्र जलाभिषकाबरोबर धार्मिक मंत्रोच्चार आणि पूजाविधी देखील केले गेले. या धार्मिक विधींमध्ये भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यासाठी मंदिराच्या आवारामध्ये मोठी तयारी देखील केली गेलेली होती. यामुले भाविकांचा उत्साह अधिकच वाढला होता.
मंत्रोच्चारामुळे भारलेल्या आसमंतात जलाभिषेक करण्यात आल्यावर सर्व उपस्थितांमध्ये आशीर्वाद आणि दैवी चैतन्य निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भारत आणि नेपाळच्या अनेक भागातील भाविक श्रीलंकेतील भाविकांमध्ये सामील झाले होते. कालच भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेतील संसद सदस्य आणि इतर मान्यवरांसह मयुरापती श्री पाथरकाली अम्मान कोविल येथून पवित्र सरयू पाण्याच्या रथयात्रेचे उद्घाटन केले होते.





