Kumamoto Masters Japan 2024 | राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीला मंगळवारी कुमामोटो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत (Round of 32) चायनीज तैपेई जोडीकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत महिला दुहेरीत त्रिशा/गायत्री जोडी (Trisha Jolly & Gayatri Gopichand) या एकमेव भारतीय आव्हानवीर होत्या. इतर भारतीय बॅडमिंटनपटूंनी पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात भाग घेतलेला नाही. त्यामुळे या पराभवासह महिला दुहेरीतील भारताचे अभियान संपुष्टात आले आहे.
36 मिनिटे चाललेल्या या सामन्यात बॅडमिंटन क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला 29व्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेई जोडी हसू यिन-हुई/लिन झिह युन यांच्याकडून 16-21, 16-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. भारतीय जोडीचा हसू आणि लिनविरुद्ध तीन सामन्यांतील हा पहिला पराभव आहे.
सिंधू-लक्ष्यची मोहिम बुधवारपासून सुरू…
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता लक्ष्य सेन देखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत. दोघेही बुधवारी आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. यापूर्वी, पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य यांनी शेवटच्या वेळी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात डेन्मार्क ओपनमध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमध्ये भाग घेतला होता.
ATP Finals 2024 : बोपण्णा-एबडेन जोडीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का….
जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा सामना करावा लागणार आहे, तर बॅडमिंटन पुरुष एकेरीत 17व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्याचा सामना पहिल्या फेरीत मलेशियाच्या 31व्या क्रमाकांवरील ‘लिओंग जून हाओ’ शी होईल.