Japan earthquake: 7.5 तीव्रतेचा भीषण भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
Japan earthquake: सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून तटीय भागातील लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Japan earthquake: जपानच्या उत्तर-पूर्व किनारपट्टीला सोमवारी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपानंतर प्रशासनाने तात्काळ त्सुनामीचा इशारा (Tsunami Alert) जारी केला असून, समुद्रकिनाऱ्यालगतच्या हजारो नागरिकांना उंचावर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भूकंपाची तीव्रता पाहता बुलेट ट्रेन सेवा ठप्प झाली असून अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्रस्थान पॅसिफिक महासागरात १० किमी खोलीवर (सनरिकु तट) येथे असल्याचे सांगितले जात आहे.
३ मीटरपर्यंतच्या लाटा धडकण्याची शक्यता – (Japan earthquake)
जपान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, इवाते प्रांतातील कुजी बंदरात ८० सेंटीमीटर आणि इतर भागात ४० सेंटीमीटर उंचीच्या त्सुनामी लहरींची नोंद झाली आहे. मात्र, ३ मीटरपर्यंतच्या लाटा धडकण्याची शक्यता असल्याने ओत्सुची आणि कामाईशी यांसारख्या बंदर शहरांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ‘त्सुनामी! तात्काळ बाहेर पडा!’ असे इशारे टीव्ही चॅनेलवर झळकत असून नागरिक सुरक्षिततेसाठी धावपळ करताना दिसत आहेत.
🇯🇵 Ships flee after massive 7.4 magnitude earthquake hit offshore at a depth of 10 km, with a tsunami warning of 3m for Iwate and Hokkaido. pic.twitter.com/aiBVvRydwn https://t.co/l7jL5tRWZ6
— Mario Nawfal (@MarioNawfal) April 20, 2026
दैनंदिन जीवनावर परिणाम – (Japan earthquake)
भूकंपामुळे टोक्यो आणि ओमोरी दरम्यानची बुलेट ट्रेन (Shinkansen) सेवा तातडीने थांबवण्यात आली आहे. ‘टोक्यो इलेक्ट्रिक पॉवर’ आणि ‘तोहोकू इलेक्ट्रिक पॉवर’ कंपनीने आपल्या प्रकल्पांची तपासणी सुरू केली आहे. सध्या बंद असलेल्या ओनागावा अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचा फटका बसला आहे का, याची काटेकोर तपासणी सुरू आहे. जपानच्या तीव्रता मोजमापानुसार हा भूकंप ‘अप्पर ५’ श्रेणीतील होता. इतक्या तीव्रतेच्या धक्क्याने काँक्रीटच्या भिंती कोसळू शकतात आणि माणसांना चालणे कठीण होते.
पंतप्रधानांचे आवाहन –
पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही संभाव्य नुकसान आणि जीवितहानीचा आढावा घेत आहोत. मदत आणि बचाव यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
SCENE: Strong earthquake off #Japan‘s northeastern coast felt in #Tokyo https://t.co/TTJ9rRuJG1 pic.twitter.com/iNnAOuKzGJ
— ShanghaiEye🚀official (@ShanghaiEye) April 20, 2026
जपान आणि भूकंपाचा धोका –
जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. जगातील रिश्टर स्केल ६.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या एकूण भूकंपांपैकी २०% भूकंप एकट्या जपानमध्ये होतात. २०११ मध्ये आलेल्या महाभयंकर भूकंप आणि त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली होती, ज्याच्या आठवणी या नव्या संकटामुळे ताज्या झाल्या आहेत.
सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून तटीय भागातील लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





