Ranbir Kapoor: ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’; ‘रामायण’च्या ट्रोलिंगवर रणबीर कपूरची प्रतिक्रिया
Ranbir Kapoor: 'रामायण'चा पहिला भाग यंदा ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान आता रणबीरने सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान रणबीरला ऑनलाइन ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गाण्याचा संदर्भ दिला.
तो म्हणाला, “अशा वेळी जुन्या गाण्याची एक ओळ योग्य वाटते. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ हा एक उत्तम विचार आहे. आजच्या काळात ऑनलाइन ट्रोलिंग खूप सामान्य झाले आहे. लोक काय बोलतात, याचा अजिबात त्रास करून घेऊ नये.”
प्रत्येकाच्या मताला महत्त्व देत बसण्यापेक्षा आपल्या कामाची आणि कष्टांची कदर करणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया अधिक महत्त्वाच्या आहे. तुमचं काम, तुमचा हेतू आणि तुमचं वागणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही मेहनत घेत असाल आणि कामाप्रती प्रामाणिक असाल, तर तुमचे कामच तुमच्या वतीने उत्तर देईल, असे त्याचे म्हणणे आहे.
‘रामायण’वरून सोशल मीडियावर चर्चा
या चित्रपटातील ‘मंगल रंग’ या गाण्यासह काही सादरीकरणे, कास्टिंग आणि इतर बाबींवर सोशल मीडियावर चर्चा आणि टीका होत आहे. ‘रामायण’सारख्या भारतीय महाकाव्यावर आधारित चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. अशा परिस्थितीत रणबीरने ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून कामावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला आहे.
दरम्यान, नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साई पल्लवी सीतेची, तर रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत.
‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीच्या आसपास प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
हेही वाचा:





