पिंपरी | राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘क्षितिजा’ची सुवर्णपदकाची हॅटट्रिक

खालापूर, (वार्ताहर) – परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती या आठ विभागातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.
राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कुस्तीपटूंनी आपले कौशल्य पणाला लावले होते. यावेळी मुंबई विभागाचे नेतृत्व करताना रायगडच्या कु. क्षितिजा मरागजे हिने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकून नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.
क्षितिजा मरागजे ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची महिला मल्ल असून राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्तीचा सराव करीत आहे.
क्षितिजा खोपोली येथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिला शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया च्या मुंबई येथील कुस्ती केंद्रात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राजसिंग चिकारा, अमोल यादव, शिल्पी नरशिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली क्षितिजा सध्या कुस्तीचे डावपेच शिकत आहे.
राज्यस्तरीय पातळीवर केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर क्षितिजाची गोरखपूर – उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.





