पुणे जिल्हा | मुळशी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत 235 खेळाडूंचा भाग

पिरंगुट, (वार्ताहर) – मुळशी तालुकास्तरीय शालेय क्रीडा कुस्ती उत्साहात पार पडली. स्पर्धेत यात 28 शाळांमधील 175 मुले व 60 मुली अशा एकूण 235 खेळाडूंनी भाग घेतला. यातील विजेत्या खेळाडूंना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ब माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या वतीने पदक देऊन गौरविण्यात आले.
भरे (ता. मुळशी) येथील मुळशी तालुका क्रीडा संकुलात शालेय कुस्ती स्पर्धा कै. पै. प्रा. सागर तांगडे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाच्या सहकार्याने पिरंगुट येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलने स्पर्धेचे नियोजन केले होते.
उद्घाटन मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, राष्ट्रीय तालीम संघ सदस्य स्वस्तिक चोंधे, संस्कार स्कूलच्या प्राचार्या स्नेहा साठे, कुस्ती कोच प्रतिक्षा सुतार आदिंच्या हस्ते झाले. कै. प्रा. पै. सागर तांगडे यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. पारितोषिक वितरण माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ अध्यक्ष सुनिल सातव, उपाध्यक्ष संतोष बनकर, कार्याध्यक्ष. गोरख शहाणे, खजिनदार बाळासाहेब गायकर, सचिव संदीप पवार, राष्ट्रीय पंच. चंद्रकांत मोहोळ,
विठ्ठल मोहोळ, रोहिदास आमले, निलेश मारणे, हनुमंत मणेरे, विक्रम पवळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतीक्षा सुतार यांनी केले. प्रास्ताविक संदीप पवार यांनी केले. स्नेहा साठे यांनी आभार मानले.





