अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरणासाठी 2 कोटींचा निधी
कराड – रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील कृष्णा नदीच्या घाटाचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2 कोटी 8 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झालेला असून या निधीमुळे रेठरे बुद्रुकच्या कृष्णा घाटाला नवी झळाळी मिळणार आहे.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातून वाहणारी कृष्णा नदी ही गावासाठी जीवनदायिनी आहे. या नदी शेजारी असणाऱ्या घाटाला ऐतिहासिक असे महत्व असून घाटावर असणाऱ्या विविध देवदेवतांच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कराड आणि वाळवा तालुक्याच्या मध्यावर असणाऱ्या या गावातील सुसज्ज नदी घाटावरील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नदीघाटाचे सुशोभीकरण करणे आवश्यक होते.
या अनुषंगाने ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत रेठरे बुद्रुक येथील नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे दाखल केला होता. याची तातडीने दखल घेत राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी 13 कोटी 18 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी रेठरे बुद्रुक कृष्णा नदीच्या घाट बांधकामासाठी व सुशोभीकरणासाठी 2 कोटी 8 लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून यातील 21 लाख रूपयांचा निधी तातडीने वितरितही केला आहे. याबाबतचा शासन आदेश 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निधीतून लवकरच नदीकाठी विकासकार्य सुरू होणार असून, यामुळे रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीघाटावरील पर्यटनाला चालना मिळणार आहे.