पुणे | मुलींनी निर्भय बनले पाहिजे : गोयल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुलगी ही कुटुंबाचा प्रमुख घटक असून सामाजिक उन्नतीचा पाया तिच्या कडूनच रचला जातो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला न घाबरता येणाऱ्या आव्हानाला सामोरे जात तिने निर्भयतेने वावरले पाहिजे, असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ते बोलत होते. निर्भय कन्या हा ज्वलंत विषय यावर्षी देखाव्यात सादर करण्यात आला होता.
या प्रसंगी सहसचिव सुरजभान अगरवाल, संचालक राजेंद्र भुतडा, महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव डॉ. संजय चाकणे, गजानन आहेर, सरिता नायर, शरदचंद्र बोटेकर, नवनाथ जाधव, महादेव रोकडे, मंगेश दळवी आणि संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेच्या सर्व विभागांनी मिळून सालाबाद प्रमाणे ढोल लेझीम, पथनाट्य, दिंडी अशा अनेक कला अविष्कारानी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. ज्ञान, बुद्धी, आणि शक्तीचे स्त्रोत असणाऱ्या श्री. गणराया कडून सदसद विवेक बुद्धीने आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे प्रतिपादन डॉ.संजय चाकणे यांनी केले.





