Asia Cup 2025 : “श्रेयसला संघातून वगळण्याचे कारण पूर्णपणे ‘बकवास’…”, क्रिस श्रीकांत यांचा आगरकरांवर हल्लाबोल!

अजित आगरकर यांच्या वक्तव्यावर टीका –
मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांना अय्यरला संघात का स्थान देण्यात आले नाही, असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “श्रेयसला कोणाच्या जागी घ्यायचे? यात त्याचीही चूक नाही आणि आमचीही चूक नाही. सध्या आम्ही फक्त 15 खेळाडूंचीच निवड करू शकतो.” या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना श्रीकांत म्हणाले, “एका खेळाडूने एवढी शानदार कामगिरी केली आहे आणि तुम्ही म्हणता की त्याला कोणाच्या जागी घ्यायचे? हे वक्तव्य मला अजिबात समजले नाही. अगरकर यांचे हे वक्तव्य पूर्णपणे बकवास आहे. मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही.”
“श्रेयसला गोंधळात टाकले” – क्रिस श्रीकांत
श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, निवड समितीच्या या निर्णयामुळे अय्यर पूर्णपणे गोंधळात पडला आहे. ते म्हणाले, “श्रेयसने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तरीही तुम्ही त्याला वगळले. यामुळे तुम्ही त्याला गोंधळात टाकले आहे.” आयपीएल 2025 मध्ये अय्यरने 17 डावांमध्ये 604 धावा केल्या, यात 50.33 ची सरासरी आणि 175.07 चा स्ट्राइक रेट होता. सहा अर्धशतकांसह त्याने आपली क्षमता सिद्ध केली होती. तरीही त्याला आशिया कपच्या 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही.
चाहत्यांमध्येही नाराजी –
श्रेयस अय्यरला संघातून वगळण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. श्रीकांत यांनी निवड समितीच्या या निर्णयाला ‘न समजणारा निर्णय’ ठरवताना अय्यरच्या प्रतिभेला योग्य संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. येत्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी आणि मधल्या फळीची जबाबदारी कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





