Koyta Gang Terror – शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष असलेल्या शत्रुघ्न काटे यांच्या प्रभागातच गुंडांनी मोठी दहशत माजवल्याचे समोर आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी भाजपला भरभरून पाठिंबा देत चारपैकी तीन नगरसेवक निवडून दिले. यंदा स्पष्ट बहुमत देऊनही अपेक्षित प्रशासन आणि सुरक्षितता नागरिकांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रभागात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते अपघातांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकतीच पिंपळे सौदागर येथे कोयता गँगने व्यावसायिकांना धमकावत खंडणीची मागणी केली. विशेष म्हणजे, दोन दशकांपासून महापालिकेत प्रतिनिधित्व करणारे आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले बापू काटे यांच्या प्रभागातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अलीकडेच घडलेल्या एका घटनेत कोयता गँगमधील काही युवकांनी एका मोमोज विक्रेत्याकडून खंडणीची मागणी केली. व्यापाऱ्याने नकार दिल्यानंतर संबंधितांनी दुकानाची तसेच त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि लघु व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीपुरते सक्रिय न राहता प्रभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. “घटना घडली त्यादिवशीच पोलीस प्रशानातील वरिष्ठांना सूचना केल्या आहेत. पिंपळे सौदागर येथील नागरिक चांगले आहेत, असा पद्धतीने कोणी दहशत पसरवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत.” – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.