कोयना होणार पर्यटनाचे हब

कोयनानगर : निसर्गरम्य कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य शासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कोयनानगर येथे दोन मोठे बहुउद्देशीय प्रकल्प प्रस्तावित आहेत. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे हे दोन्ही ड्रीम प्रोजेक्ट असून पर्यटनवाढीसाठी माईलस्टोन ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीनंतर कोयना पर्यटन अल्पावधीतच जागतिक पर्यटन क्षेत्राच्या क्रमवारीत नंबर वन येईल असा विश्वास आहेत. येथील नेहरू उद्यानात वृंदावन गार्डन उभारले जाणार आहे.
पर्यटकांना ओझर्डे धबधबा अधिक जवळून अनुभवता यावा यासाठी येथे स्काय- वॉक प्रकल्प उभारला जाणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे कोयना परिसराचा निसर्गसौंदर्याचा जागतिक स्तरावर विस्तार होण्याचा मानस मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. कोयना धरण, जलविद्युत प्रकल्प, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, नेहरू उद्यान, आणि सूर्यास्त- सूर्योदयाचे मनमोहक दृश्य ही ठिकाणे आधीच प्रसिद्ध आहेत.
आता जलपर्यटन आणि वनपर्यटनाच्या जोडीनं हा निसर्ग पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल. कोयना परिसराचा पर्यटन हब म्हणून विकास हा महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी मोठा टप्पा ठरणार आहे. वृंदावन गार्डन आणि स्काय-वॉकसारखे प्रकल्प पर्यटकांसाठी नवनवीन अनुभव देतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. या संकल्पनेतून पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी या मेगा प्रकल्पाची संकल्पना मांडली आहॆ.
स्काय-वॉक प्रकल्प
ओझर्डे धबधब्यावर प्रस्तावित स्काय- वॉक हा एक रोमांचक अनुभव ठरेल. धबधब्याच्या वरून चालत जाण्याची संधी पर्यटकांसाठी थरारक ठरेल आणि त्यांना निसर्ग अधिक जवळून अनुभवता येईल.
वृंदावन गार्डन
नेहरू उद्यानात उभारण्यात येणाऱ्या या गार्डनमुळे कोयनानगरचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल. यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षण निर्माण होईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल.




