Koyna earthquake : कोयनेतील भूकंपमापन यंत्रे पाच महिन्यांपासून बंद; प्रशासन सुस्त
Koyna earthquake : आजपर्यंत १ लाख २१ हजार ७३५ भूकंपांची नोंद, नवीन यंत्रणेसाठी २.३० कोटींचा निधी देऊनही तीन वर्षांचा विलंब

Koyna earthquake : कोयनानगर (विजय लाड) – भूकंपप्रवण कोयना परिसरातील भूकंपमापनाची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली असून, प्रकल्पातील पाचही भूकंपमापक यंत्रे पाच महिन्यांपासून बंद आहेत. विशेष म्हणजे १९९३ पासून या यंत्रणेद्वारे आतापर्यंत तब्बल १ लाख २१ हजार ७३५ छोटे मोठे भूकंप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूकंपीय हालचालींच्या नोंदी असलेल्या कोयना परिसरात भूकंपमापनच बंद असल्याने या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोयना प्रकल्पात ‘MEQ-8000 Analog’ प्रकारची पाच भूकंपमापन यंत्रे आहेत. त्यापैकी चार यंत्रे यापूर्वीच बंद पडली होती. त्यामुळे एका यंत्रावर भूकंपमापन सुरु होते. मात्र, १ मे २०२६ रोजी हे शेवटचे कार्यरत यंत्रही बिघाडामुळे बंद पडले. त्यानंतर पाच महिन्यांपासून कोयना प्रकल्पातील भूकंपमापन पूर्णपणे ठप्प आहे. १९९३ पासून या यंत्रणेद्वारे नोंदविलेल्या भूकंपांच्या नोंदी कोयना परिसरातील भूकंपीय हालचालींच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. सूक्ष्म भूकंपांच्या वारंवारतेतील बदल, त्यांचे स्थान आणि स्वरुप समजून घेण्यासाठी सातत्यपूर्ण निरीक्षण आवश्यक असते. त्यामुळे पाच महिन्यांपासून संपूर्ण निरीक्षण व्यवस्था बंद राहणे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, नवीन यंत्रणा उभारण्यासाठी निधीची कमतरता असल्याचेही कारण पुढे करता येणार नाही. कोयना प्रकल्पातील पाच जुन्या यंत्रांना पर्याय म्हणून नवीन पाच भूकंपमापन यंत्रणेसाठी २०२३ मध्येच नाशिक येथील उपकरण संशोधन विभाग (मेरी) यांना २ कोटी ३० लाख रुपये देण्यात आले आहेत. मात्र, निधी देऊन तीन वर्षे उलटूनही नवीन यंत्रणा अद्याप मिळालेली नसल्याचे कोयना प्रकल्पाच्या उपकरण उपविभागाचे उपअभियंता किरण कानगुडे यांनी सांगितले.
प्रभावी भूकंपमापनासाठी सुमारे ५० लाख रुपये किमतीचा डिजिटल ब्रॉडबँड सेस्मोग्राफ बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. जुन्या ‘MEQ-8000 Analog’ यंत्रणेला आधुनिक डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असताना, निधी उपलब्ध होऊनही नवीन यंत्रणा प्रत्यक्षात येण्यास झालेला विलंब आता चर्चेचा विषय बनला आहे. मेरीकडून यंत्रणा उपलब्ध होण्यास विलंब का झाला आणि त्यासाठी आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली, याची माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेवटचे कार्यरत यंत्र बंद पडल्यानंतर पाच महिन्यांत पर्यायी भूकंपमापन व्यवस्था का उभी करण्यात आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
वैज्ञानिक निरीक्षणात पोकळी –
भूकंपमापन यंत्रणा बंद असल्यामुळे कोयना परिसरातील भूकंपीय हालचालींच्या नियमित नोंदी खंडित झाल्याने वैज्ञानिक निरीक्षणात निश्चितच पोकळी निर्माण झाली आहे. धरण आणि परिसराच्या भूकंपीय स्थितीचा दीर्घकालीन अभ्यास लक्षात घेता ही निरीक्षण व्यवस्था अखंडित असणे आवश्यक आहे.पाचही जुनी यंत्रे बंद असून पाच महिन्यांपासून भूकंपमापन ठप्प आणि दुसरीकडे नवीन यंत्रणेसाठी तीन वर्षांपूर्वीच निधी उपलब्ध असताना आता विलंबाची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. आधुनिक भूकंपमापन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.





