Koyna dam water level: महाराष्ट्राची चिंता वाढली! कोयना धरणाने गाठला तळ; ‘या’ मोठ्या संकटाची नांदी?
Koyna dam water level: पाणी तळाला गेल्याने गाळ आला वर, पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; कोयना परिसरात दीर्घकालीन जलनीतीची गरज.

Koyna dam water level – तीव्र उन्हाळा आणि पावसाळा लांबल्याने कोयना धरणाती पाण्याने तळ गाठला आहे. राज्याची ऊर्जा, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवणार्या या धरणातील पाणीसाठा 9.42 टीएमसी इतका कमी झाल्याने, चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पाणी कमी झाल्याने गाळ वर येत असून, त्याचा दर्प पसरत आहे.
कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता 105.25 टीएमसी असून, या धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशांनुसार केले जाते. तांत्रिक वर्षात (1 जून ते 31 मे) 67.50 टीएमसी पाणी वीज प्रकल्पासाठी आणि 35 टीएमसी पाणी धरणाच्या पूर्वेकडील शेतीच्या सिंचनासाठी देण्यात येते. मात्र, नियोजित पाणीसाठा यंदा 28 मे रोजीच संपुष्टात आला आहे.
सद्य:स्थितीत धरणातील पाणीसाठा 9.42 टीएमसी झाला असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पाणी तळाला गेल्याने गाळ वर येऊ लागला असून, पाण्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरणातील पाण्यावर होणार्या वीज निर्मितीवर आधीच मर्यादा आल्या असताना, धरणाच्या पूर्वेकडील भागातील शेतीच्या सिंचनावरही मोठा परिणाम झाला आहे. पाण्याअभावी शेती करपण्याची वेळ आल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शेती वाचवण्यासाठी धरणातून सध्या 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलसंपत्तीचे योग्य नियोजन, गाळ तातडीने काढण्याबरोबरच दीर्घकालीन जलनीतीची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. दरम्यान, कोयना परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली, तरी तो अपुरा ठरला आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.





