Satara News : कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार; आजपासून १८,६६५ क्युसेक विसर्ग सुरू

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत असून, ती आज सकाळी 2143’03’’ (653.263 मीटर) इतकी झाली आहे. धरणात सध्या ८१.८७ टीएमसी (७७.७ टक्के) इतका पाणीसाठा असून, वाढता पावसाचा जोर लक्षात घेता जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी ४ फूट उघडले जाणार असून, त्यातून १६,५६५ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या पायथा विद्युतगृहाच्या दोन्ही युनिट्सद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपात्रात एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग सुरू होणार आह
याआधीही १५ जुलै ते २४ जुलै या नऊ दिवसांच्या कालावधीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्या कालावधीत एकूण १० टीएमसी पाणीसाठा नदीपात्रात विसर्गीत करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यातील ५ टीएमसी पाणीसाठा केवळ सहा वक्र दरवाज्यांतून विनावापर (नो युटिलायझेशन) नदीत सोडला गेला होता.
पावसाची नोंद (२५ जुलै रोजी)
कोयना: 133 मिलिमीटर (एकूण 2776 मिमी)
नवजा: 188 मिलिमीटर (एकूण 2989 मिमी)
महाबळेश्वर: 226 मिलिमीटर (एकूण 3013 मिमी)
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोयना नदीच्या काठावर अनावश्यक वावर टाळावा, असे प्रशासनाचं आवाहन आहे. स्थानिक यंत्रणांनी सज्जता ठेवावी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.





