Koyna Dam : कोयना धरणात 83 टीएमसी पाणीसाठा
सह्याद्रीच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 83 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

Koyna Dam : सह्याद्रीच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 83 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
आज दिवसभरात कोयना परिसरात (Koyna Dam) मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला. कोयनानगर येथे सुमारे ३१ मिलिमीटर तर नवजा येथे ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक सध्या १८ हजार क्यूसेकच्या आसपास कायम आहे.
धरणातील (Koyna Dam) वाढती जलपातळी लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन सुरू केले आहे. त्यानुसार कोयना प्रकल्पातील पायथा वीजगृह कार्यान्वित करण्यात आले असून वीज निर्मितीसाठी १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या धरणाच्या दरवाजांतून पाणी सोडण्यात आलेले नाही.
पावसाची स्थिती आणि धरणातील आवक यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील काही दिवसांत पर्जन्यमान वाढल्यास विसर्गाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.






