Kothrud Murder Case: व्हॉट्सअॅप स्टेटसवरून रक्तरंजित खेळ! कोथरूड टेकडीवर १७ वर्षीय मुलाचा निर्घृण खून
Kothrud Murder Case: सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांमुळे घटना उघडकीस; कोथरूड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून दोन विधिसंघर्षीत मुलांना घेतले ताब्यात.

Kothrud Murder Case – व्हॉट्सअॅप स्टेटसवर मारहाण करणाऱ्या तरुणांचे फोटो ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात डोक्यात लोखंडी हातोडी घालून १७ वर्षीय मुलाचा दोघांनी खून केला. खून करणारे दोघे अल्पवयीन असून, त्यांना कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी (दि. १९) पहाटे कोथरूड येथील एआरएआय टेकडीवर घडली आहे. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला युवक नील आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीपैकी एकाला काही तरुणांनी मारहाण केली होती. ते सर्व आता कारागृहात असून, नील त्यांचे फोटो आपल्या व्हाटस्अप स्टेटसला ठेवत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होता. मंगळवारी (दि. १८) नील आणि दोघे विधिसंघर्षीत मुले एकाच दुचाकीवर राजगड येथील एका शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले.
त्यानंतर ते पहाटे परत आले. त्यानंतर तिघे टेकडीवर गेले होते, तेथे दोघांनी नीलच्या डोक्यात हातोडी मारून त्याचा खून करून ते फरार झाले होते. सकाळी टेकडीवर गेलेल्या काही लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी कोथरूड पोलिसांना माहिती दिली. नीलच्या मोबाइलवरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. चौकशीत दोघांनी त्याचा खून केल्याचे समोर आले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.




