Pune Crime : घरफोडी करणारे उत्तर प्रदेशातील दोन आरोपी 24 तासांत जेरबंद
Pune Crime : पुण्यातील कोथरूडच्या उजवी भुसारी कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून ७ लाखांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी २४ तासांत अटक केली.

Pune Crime : कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील फ्लॅट फोडून सात लाख सात हजार ३६० रुपयांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. अहमद रजा इसरार अहमद खान आणि फैय्याज मेराज शहा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण कॉपर वायर हस्तगत केली आहे.
याप्रकरणी श्रीकांत सिद्धू यादव (वय ३६, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, रा. निकम चाळ, गल्ली क्रमांक ७, कर्वेनगर, पुणे) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २५ ऑक्टोबर रोजी उजवी भुसारी कॉलनी येथील नवीन बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या इमारतीतील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ७ हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली होती. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात –
घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्यासह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी पथकाला दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण आणि त्यांचे पथक कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
यावेळी पोलीस हवालदार योगेश सुळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीची कॉपर वायर विक्री करण्यासाठी दोन संशयित डुक्कर खिंड सर्व्हिस रोड परिसरात येणार आहेत. ही माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे अहमद रजा इसरार अहमद खान (रा. हरैय्या चंद्रासी, ता. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) आणि फैय्याज मेराज शहा (रा. सिशानिया घोपलापूर, रामनगर, ता. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) अशी सांगितली. त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये कॉपर वायर आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही वायर उजवी भुसारी कॉलनीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही आरोपींना घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली सात लाख सात हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई –
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन, डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक सुनील कारोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घले, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस हवालदार योगेश सुळ, पोलीस अंमलदार गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदीप जवादे, सूरज कदम आणि उमेश राऊत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




