ATM Robbery: खंडाळ्यात ‘फिल्म स्टाइल’ दरोडा! कॅमेऱ्यावर स्प्रे मारला अन् महाबँकेचे एटीएम फोडून रोकड लंपास
ATM Robbery: पहाटे ३.४५ वाजता आलिशान गाडीतून आलेल्या चोरट्यांचा कारनामा; गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून सव्वादोन रोकड पळवली.

ATM Robbery – एका आलिशान गाडीतून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने बुधवारी पहाटे खंडाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून दोन लाख 34 हजार 400 रुपयांची रोकड चोरून नेली. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेर्यांवर कलर स्प्रे मारल्याने चोरट्यांची संख्या समजू शकलेली नाही. चोरट्यांनी पहाटे 3.45 च्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला.
चेहरे दिसू नयेत म्हणून, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांवर कलर स्प्रे मारले. सायरन वाजू नये, म्हणून वायर तोडल्या. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमचा पुढील भाग कापून, दोन लाख 34 हजार 400 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. एटीएम तोडल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या हैदराबाद येथील मुख्य शाखेत अलार्म वाजला. तेथून पोलिसांना माहिती कळवेपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते.
या घटनेची माहिती कळताच फलटण पोलीस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक पथकही दाखल झाले. याबाबत बँकेच्या शाखाअधिकारी मेरी सिन्हा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष म्हस्के तपास करत आहेत.
सुरक्षा नसल्याने महाबँकेचे एटीएम लक्ष्य?
बँकेची शाखा आणि एटीएम एकाच ठिकाणी असूनही, तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. सुरक्षारक्षक असता, तर ही चोरी झाली नसती; परंतु बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याच शाखेत अशी व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच चोरट्यांनी या बँकेच्या एटीएमला लक्ष्य केल्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या अभावी बँकेच्या कोणत्याही शाखेत अशे घटना घडू शकते. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापनाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.





