Shikrapur Accident – पुणे–नगर महामार्गावर शिक्रापूर येथे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुभाजक ओलांडून दोन कारला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात एका कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील किरण गोटीराम वैद्य आणि बंडू वैद्य हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी किरण गोटीराम वैद्य (वय 31, रा. वडेगाव, चेतनानगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुशांत प्रधान (वय 35, रा. भीमा भोईनगर, संभळपूर, ओडिशा) या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण वैद्य हे त्यांच्या (एमएच 20 एचबी 3578) क्रमांकाच्या कारने अहिल्यानगरकडून पुण्याकडे जात होते. शिक्रापूर येथील तिरंगा हॉटेलसमोर समोरून येणाऱ्या (ओडी 15 डी 0891) क्रमांकाच्या कंटेनरचे नियंत्रण सुटले. कंटेनरने दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला येत प्रथम वैद्य यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर शेजारील (एमएच 44 एई 6856) क्रमांकाच्या दुसऱ्या कारलाही धडक बसली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, कारच्या एअरबॅग उघडल्या आणि पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात किरण वैद्य आणि बंडू वैद्य गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.