Kolkata | Crime News – कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणाला वर्ष उलटले असतानाच आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. या घटनेने कोलकातासह संपूर्ण देश हादरला. कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि त्याच संस्थेतील दोन कर्मचारी आहेत. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. २५ जून रोजी रात्री ही घटना घडली. या काळात पीडिता दयेची याचना करत राहिली; पण आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या महाविद्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या एका गार्डच्या खोलीत हा कथित गुन्हा घडला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाइल फोनही जप्त केले आहेत आणि तिघांनाही न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबियांनाही बोलावून घटनेबद्दल विचारपूस केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुख्य आरोपी हा महाविद्यालयाच्या तृणमूल काँग्रेस छात्र परिषद युनिटचा माजी अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या दक्षिण कोलकाता शाखेचा संघटन सचिव आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने आरोपीशी सध्या कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट करत आरोपी दोषी आढळल्यास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.