Kolkata news: कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च दखल; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Kolkata news – कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर देशभर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी देशभरात निदर्शनेही केली जात आहेत. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतली असून यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणासंदर्भात एक पत्र सरन्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना लिहिण्यात आले होत. ज्यामध्ये सरन्यायाधीशांना या संपूर्ण प्रकरणाची स्वतःहून दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण केवळ एका निष्पापाचे जीवन संपवण्यापुरते नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
हा आपल्या राष्ट्राच्या आत्म्यावरील हल्ला आहे, आपल्या महान संविधानाने मानलेल्या न्याय आणि मानवतेच्या आदर्शांचा घोर अपमान असल्याचे नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे.
ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे. या प्रकरणाची कोलकाता उच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, सीबआयने संजय रॉय याला बोलवले आहे.
सीबीआय ३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएट करत आहे. तसेच याच इतर डॉक्टरांची मदत घेत आहे. सीबीआयने शुक्रवारी रुग्णालयातील काही डॉक्टरांची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जे घटनेच्या दिवशी रुग्णालयात हजर होते.
यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चौकशी केली आहे. बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
राजीनामा देताना घोष यांनी भिती व्यक्त केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना एकल पीठाकडे जाण्यास सांगितले.





