Kolkata Doctors Strike : अखेर ४१ दिवसांनी संप मागे ! आर जी कर रुग्णालयातील डॉक्टर कामावर होणार रुजू

Kolkata Doctors Strike – आर जी कर रुग्णालयातील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार ९ ऑगस्टला उघडकीस आला. यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांनी संप पुकारला होता.
यानंतर दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यानंतर आता ४१ दिवसांनी डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर कले आहे. २१ सप्टेंबरपासून सर्व डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी संपकरी कनिष्ठ डॉक्टरांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत संबधित अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. तसेच, अनेक मागण्या मान्य करत असल्याचे आश्वासन दिले होते.
आंदोलक डॉ. अकीब यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले की, पश्चिम बंगाल कनिष्ठ डॉक्टर्स फ्रंटने आंदोलनाच्या काळामध्ये अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. पण, काही गोष्टी अजूनही मिळालेल्या नाहीत. आमचे आंदोलन संपले असा अर्थ घेण्यात येऊ नये. आम्ही नव्या पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालच्या सरकारने दिलेल्या आदेशानुसार, डॉक्टरांना बचाव आणि सुरक्षेसंदर्भातील उपाय योजना राबिवले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मुख्य सचिवांना देखील पदावरुन हटवले जाणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आल्याची माहिती आंदोलक डॉ. अकीब यांनी दिली.
तसेच, 21 सप्टेंबरपासून आम्ही आमचे काम सुरु करू. पण यानंतरही प्रशासनावर आमचे लक्ष असणार आहे. आम्हाला काही चुकीचे आढळल्यास आणखी मजबुतीने मैदानात उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.





