kolkata doctors strike : बंगालमधील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

कोलकता – पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दर्शवला. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
बंगालची राजधानी कोलकत्यामधील सरकारी रूग्णालयात दोन महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्या धक्कादायक घटनेच्या निषेधासाठी आणि पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी याआधी काम बंद आंदोलन केले.
त्यानंतर ५ ऑक्टोबरपासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बंगालचे आरोग्य सचिव एन.एस.निगम यांना हटवण्यात यावे, कार्यस्थळी सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात आदी मागण्याही आंदोलक निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.
आता त्यांच्या उपोषणाच्या नवव्या दिवशी भाजपच्या बंगाल शाखेने त्यांना पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १६ सप्टेंबरला निवासी डॉक्टरांची बैठक घेतली. त्यामध्ये वैद्यकीय आस्थापनांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले.
मात्र, त्या आश्वासनापासून बंगाल सरकारने घूमजाव केले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. याआधीही भाजपने निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला सातत्याने पाठिंबा दर्शवला. मात्र, यावेळी प्रथमच त्या पक्षाने कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.





