Kolhapur tourist – दुबईमध्ये अडकलेले कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पर्यटकांचा गट मंगळवारी मुंबईत सुरक्षितपणे परतला आहे. हे सर्वजण ज्या हॉटेलमध्ये होते त्यांच्याजवळच काही अंतरावर ड्रोन हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. ते एतिहाद एअरवेजच्या विमानाने मुंबईत उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील हे सर्व २३ पर्यटक आहेत. ते कोल्हापूरला पोहोचले आहेत, असे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रसाद संकपाल म्हणाले. अमेरिका-इस्रायल-इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आणि विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेकजण त्याठिकाणी अडकले आहेत. आम्ही भारतात सुरक्षितपणे परत येऊ शकल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. युएईमधील सर्व अधिकारी, भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आणि कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला कोल्हापूरला परत येण्यास मदत केली. आमच्या हॉटेलपासून काही मीटर अंतरावर ड्रोन हल्ला झाला. परिस्थिती थोडी तणावपूर्ण असली तरी, संघर्षादरम्यान आम्ही आमच्या हॉटेलमध्ये सुरक्षित होतो. टूर ऑपरेटर आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही दुबईतील सर्व नियम आणि कायदे देखील पाळले, असे एका पर्यटकाने पत्रकारांना सांगितले. गटातील सदस्यांना युएई सरकारकडून सुमारे २५,००० रुपयांची निरोप भेट मिळाली आहे.