– प्रसाद पाटील Editorial : सद्यःस्थिती पाहता एरवी आलिशान गाड्यांचा, सौंदर्यवतींचा आणि पार्ट्यांचा झगमगाट (Editorial) चालणार्या, पर्यटकांच्या गर्दीने बारा महिने गजबजलेल्या दुबई महानगरामध्ये इराणच्या हल्ल्यामुळे अशांततेचे साम्राज्य वाढू लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई हे शहर गेल्या अनेक दशकांपासून आखाती देशांमधील समृद्धीचा ब्रँड म्हणून जगभरात ओळखले जाते. सुरक्षित आणि झगमगाटीपणा ही दुबईची ठळक बलस्थाने (Editorial) ठरली आहेत. अगदी अंडरवर्ल्डच्या साम्राज्यातील कुख्यात गुन्हेगारांपासून जगभरातील धनदांडग्यांपर्यंत अनेकांनी दुबईमधील वास्तव्याला पहिली पसंती देऊन या शहराची ‘रौनक’ वाढवण्याचे काम केले आहे. तप्त वाळवंटात उभ्या राहिलेल्या या जागतिक दर्जाच्या महानगराने आपल्या गगनचुंबी इमारती, विलासी जीवनशैली, आर्थिक स्थैर्याच्या जोरावर जगभरातील गुंतवणूकदारांना, पर्यटकांना आकर्षित केले आहे. मात्र, आखातातील संघर्षादरम्यान दुबईच्या सुरक्षिततेच्या कवचाला मोठे तडे गेल्याचे दिसून आले. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी मारले गेल्यावर इराणने प्रतिशोधाची भूमिका घेतली आणि प्रामुख्याने अमेरिकेच्या इशार्यावर नाचणार्या अरब राष्ट्रांना टार्गेट केले. Editorial हे हल्ले करताना इराणने जाणीवपूर्वक जागतिक परिणामांना प्राधान्य दिले. दुबई हे धनिकांचे शहर म्हणून जसे ओळखले जाते, तसेच ते जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. त्यामुळे दुबईला दिलेला धक्का हा जगाच्या विमान वाहतुकीवर आणि दळणवळणावर परिणाम करणारा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन इराणने दुबईला लक्ष्य केले. इराणने केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे केवळ दुबईच नव्हे, तर संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाच्या ज्वाळा केवळ लष्करी तळांपुरत्या मर्यादित राहिल्या नसून, त्या दुबईच्या झगमगाटापर्यंत पोहोचल्या असून या स्वप्नगरीच्या अभेद्यतेची प्रतिमा धोक्यात आली. गेल्या आठवड्यात इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन दुबईच्या हवाई क्षेत्रात घुसल्यामुळे या शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा धोका निर्माण झाला. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बुर्ज खलिफा यांसारख्या प्रसिद्ध इमारतींना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न झाला. अमिरातीमधील शेअर बाजार दोन दिवस बंद ठेवावा लागला आणि अॅमेझॉनच्या क्लाउड सुविधांवर झालेल्या हल्ल्यामुळे बँकिंग सेवांमध्येही तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे या शहराने 40 वर्षांत कमावलेली सुरक्षिततेची ओळख एका रात्रीत बदलून गेली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेलाच्या 20 टक्के पुरवठा होतो. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली असून ती 1979 च्या तेल संकटाची आठवण करून देत आहे. दुबईच्या जेबेल अली बंदरात झालेल्या अग्निकांडामुळे आणि विमान तळावर वारंवार निर्माण होणार्या ड्रोन धोक्यांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना दुबईतून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. इन्व्हेस्टमेंट बँक्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्या आता दुबईऐवजी इतर सुरक्षित ठिकाणांचा विचार करत आहेत. यामुळे चार दशके दुबईने कमावलेली विश्वासार्हता धोक्यात आली. अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी इराणचा आक्रमक पवित्रा थांबताना दिसत नाहीये. इराणने केवळ लष्करी तळांना लक्ष्य न करता दुबई, अबू धाबी आणि शारजाह यांसारख्या नागरी आणि आर्थिक केंद्रांनाही आपल्या हल्ल्याच्या कक्षेत आणले आहे. यामुळे आखाती देशांमध्ये राहणार्या लाखो लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुबईची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, व्यापार, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवांवर अवलंबून आहे. या शहराच्या यशाचा पाया हा इथली स्थिरता आणि सुरक्षितता हाच होता. जेव्हा जेव्हा आखाती युद्धे किंवा यादवी झाली, तेव्हा तेव्हा तिथली गुंतवणूक आणि लोक दुबईकडे वळले. मात्र, आता स्वतः दुबईच युद्धाच्या छायेत आल्यामुळे जागतिक भांडवल इथून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरसारख्या संस्थांमध्ये शेकडो बँका आणि हजारो वित्तीय कंपन्या कार्यरत आहेत. जर हा तणाव दीर्घकाळ टिकला, तर गुंतवणूकदार पर्यायी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेऊ लागतील. दुबईच्या एकूण उत्पन्नामध्ये तेलाचा वाटा 2 टक्क्यांपेक्षा कमी असला तरी, आखाती प्रदेशातील स्थिरता हा दुबईच्या प्रगतीचा मुख्य स्तंभ होता. 2025 मध्ये 9,800 हून अधिक करोडपती दुबईत स्थायिक झाले होते, मात्र या युद्धामुळे हे चित्र आता पालटण्याची शक्यता आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यांनी दुबईच्या निवासी भागांनाही लक्ष्य केले आहे. अल वसल आणि पाम जुमेराह यांसारख्या अतिशय उच्चभ्रू वस्तींमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे केवळ भौतिक नुकसान झाले नसून लोकांमध्ये एक प्रकारचे मानसिक दडपण निर्माण झाले आहे.ज्या नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पांवर आणि डेटा सेंटर्सवर दुबईचे जनजीवन अवलंबून आहे, त्यांनाही आता धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेच्या चिंतेमुळे पर्यटकांनी दुबईकडे पाठ फिरवल्याने, जगातील सर्वात महागड्या समजल्या जाणार्या फाइव्ह-स्टार हॉटेल्सचे भाडे 50 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. दुबईचा सर्वात पॉश भाग मानल्या जाणार्या पाम जुमेराह येथील अलिशान हॉटेल्समध्ये तीन रात्रींचे भाडे 1,01,808 रुपयांवरून थेट 65,972 रुपयांवर आले आहे. अनेक हॉटेलमध्ये केवळ 20 टक्के खोल्या भरलेल्या आहेत, ज्यामुळे व्यवसायात मोठी मंदी आली आहे. हवाई क्षेत्र वारंवार बंद होणे आणि विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे ‘शॉर्ट-टर्म’ बुकिंग पूर्णपणे ठप्प झाले आहे. दुबईतील हॉटेल उद्योग आता तोटा भरून काढण्यासाठी ‘राहा आणि जेवा’ सारख्या योजनांचा आधार घेत आहे. यामध्ये राहण्याचे भाडे, जेवण किंवा स्पा सुविधांमध्ये समाविष्ट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुबईने गेल्या काही दशकांत स्वतःला एका जागतिक ब्रँडच्या रूपात प्रस्थापित केले आहे. 1985 मध्ये अमिरात एअरलाइनची सुरुवात, बुर्ज खलिफाची निर्मिती आणि परदेशी नागरिकांना मालमत्ता खरेदीचे अधिकार देणे, हे या शहराच्या प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे होते. ही सर्व प्रगती स्थैर्याला प्राधान्य या धोरणावर आधारित होती. ही ओळख टिकवून ठेवणे हे आता तिथल्या नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. संयुक्त अरब अमिरातीची संरक्षण यंत्रणा प्रगत (Editorial) असली तरी इराणची क्षेपणास्त्र क्षमता पाहता पूर्णपणे सुरक्षित राहणे कठीण झाले आहे. या युद्धाच्या ज्वाळा जोपर्यंत शमत नाहीत, तोपर्यंत दुबईच्या भविष्यावर टांगती तलवार कायम राहील.