पुणे जिल्हा | तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या वस्तुस्थिती जाणून घ्या

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांची मुंबई येथे शिवसेना खेड-आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार,
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे, महामार्गाचे भूसंपादन प्रक्रियेतील अॅड. अशोक फडके यांनी भेट घेतली.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची निविदा प्रक्रिया 14 फेब्रुवारी2024 ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली येथून राबविण्यात आली होती.
या रस्त्यावरती दोन टप्प्यांमध्ये चार लेन एलिव्हेटेड कॉरिडोरचे निविदा प्रसिद्ध झाली होती; परंतु आचारसंहितापर्यंत या रस्त्याला कॅबिनेटची मंजुरी न मिळाल्यामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची सुद्धा व पुणे-शिरूर रस्त्यावरची निविदा प्रक्रिया सुरू होती.
मागील महिन्यामध्ये पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारने कॅबिनेटची मंजुरी देऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
त्यानंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर व वाघोली ते शिरूर या रस्त्यांवरती काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन स्थापन केलेल्या एमएसआयडीसीने या प्रकल्पांची बांधणी करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देऊन मागणी केली.
केंद्र सरकारने या दोन रस्त्यांबाबत न हरकत देऊन याबाबतचे एमयुएमओ करण्याची प्रक्रिया सुरू केली. यापैकी पुणे-शिरूर या रस्त्यावरती लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे रणजीत हांडे यांनी सांगितले.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्यावरती मात्र अद्याप पुढील कुठलीही प्रक्रिया पार न पडल्यामुळे ही प्रक्रिया थोडीफार लांबणीवर पडू शकते.
पूर्वीच्याच डीपीआर वरती काम करून चाकण परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने या कामाला गती द्यावी व सद्यस्थितीत ताब्यात असलेल्या 22 मीटर वरतीच काम सुरू करावे, अशी विनंती अमोल पवार, दिलीप मेदगे यांनी हांडे यांना केली.
हा रस्ता जमिनीवरती चार लेन व उन्नत पुलावरती चार लेन असा एकूण आठ लेनचा रस्ता होणार असून याला तळेगाव ते चाकण या 30 किलोमीटरमध्ये तीन ठिकाणी एक्सेस देण्यात येईल. फक्त आवश्यक ठिकाणी नवीन जमीन अधिग्रहण करण्यात येईल.
लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या कार्यालयातील पुढील प्रक्रियेसाठी आपण विनंती करावी अशी सूचना दिलीप मेदगे यांना केली.
मार्किंगचे पोल उभे करा
सध्या या परिसरातील अतिक्रमण राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने काढण्यात अली आहेत. नागरिक सुद्धा त्याला सहकार्य करत आहेत ही बाब समाधानाचे आहे; परंतु त्यावरती पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गाने यावरती किमान साइडपट्ट्या भरून बाजूला रस्ता मार्किंगचे पोल उभे करावेत याबाबत दिलीप मेदगे यांनी प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी चर्चा केली आहे.
स्थानिक पातळीवर सर्व मदत करणार
चाकण-महाळुंगे-खालुंब्रेे परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिक कामगार व मुंबईकडे जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीमुळे त्रास होत असून अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे.
यासाठी या प्रक्रियेला गती देण्यात यावी यासाठी स्थानिक पातळीवरती जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सर्व करण्यास तयार आहोत असे अमोल पवार यांनी एमएसआयडीसीच्या मुख्य अधिकार्यांना आश्वासित केले व तसे निवेदन त्यांना देण्यात आले.
मुंबई : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांची भेट घेत मागण्यांचे पत्र अमोल पवार, दिलीप मेदगे आदींनी दिले.




