गद्दारांना पाडा… पाडा… पाडा…

वाई, (प्रतिनिधी)- वाई मतदारसंघाला वेगळी परंपरा आहे. तुमच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांना भरभरून दिले, मात्र पक्ष फुटल्यानंतर जे सोडून गेले, अशा गद्दारांना पाडा… पाडा… पाडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सौ. अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाईतील भाजी मंडईत झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी सौ. अरुणादेवी पिसाळ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उबाठा गटाचे स्टार प्रचारक किरण माने, प्रा. दिलीप जगताप, सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर, डी. एम. बावळेकर, विराज शिंदे, डॉ. नितीन सावंत, रतन शिंदे, प्रसाद सुर्वे, ॲड. निलेश डेरे, तारिक बागवान, रामदास कांबळे, नंदकुमार घाडगे, माेहन आबा भाेसले, ॲड. विजयसिंह पिसाळ, प्रतापराजे भाेसले, अनंतराव शेळके पाटील, चंद्रकांत शेलार, अनिल जगताप, लक्ष्मण डेरे, संग्रामसिंग शेळके- पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खा.पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून लक्ष्मणराव पाटील आमच्यासोबत होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार जोपासला. मधल्या काळात भाजपने पक्ष फोडाफोडीचे राजकारण हाती घेतले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. अनेक जण आम्हाला सोडून गेले. त्यांनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी श्रीनिवास पाटील यांच्या सोबतीने कराडला जात असताना मकरंद पाटील मला भेटले. माझ्या गाडीत बसून कराडला आले. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबरच राहीन असे मला त्यांनी ठासून सांगितले. पण दुसऱ्या दिवशी हा गडी गायब झाला. मी माहिती घेतली तर त्यांनी मला कारखान्याचे दुखणं असल्याचे कारण दिले. मी म्हंटल आपण मार्ग काढू. पण त्यांनी माघार घेतली नाही, आमचा निर्णय झालाय, असे सांगितले.
आम्ही पाटील कुटुंबाला काय दिले नाही. लक्ष्मण तात्यांना दोन वेळा खासदार केले, तर यांना गावच्या सरपंचपदापासून तीन वेळा आमदार केले. किसन वीर कारखान्याचे चेअरमन केले, भावाला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, आता राज्यसभेचे सदस्यत्वपद पण मिळाले. गावचे सरपंचपद पण यांनाच पाहिजे. जे दिसलं ते आपलंच म्हणण्याची भूमिका त्यांची आहे. लक्ष्मणतात्या असते तर ही वेळ उदभवली नसती. साहेब आमचे दैवत आहेत, साहेबांशी आमची निष्ठा आहे, साहेब आमच्या हृदयात आहेत अन आमच्या खिशातही साहेबच आहेत, असे मकरंद पाटील सर्वत्र सांगत असल्याचे निदर्शनास आणून पवार यांनी तुमच्या खिशात किंवा हृदयात बसण्याएवढी माझी उंची नाही, अशा शब्दांत उपरोधिक टीका केली.
किसन वीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, विठ्ठलराव जगताप, प्रतापराव भोसले यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाची वाईला परंपरा आहे. मदनराव पिसाळ यांनी समाजहिताचे राजकारण केले. या मतदारसंघातील मतदार कधीही जातीयवादी धर्मांध शक्तींना साथ देणार नाही, अशी मला खात्री आहे. स्त्रियांना संधी मिळाली तर त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मतदारसंघात आम्ही अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. तरुणांच्या हाताला काम, महिलांचे स्वावलंबन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, औद्योगिक विकासासोबतच स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरुणादेवी यांना विजयी करा, त्यांच्या पाठीशी आमची शक्ती आणि ताकत उभी आहे, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
साै. अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विचार जोपासताना कै. मदनराव पिसाळ यांनी २० वर्षे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे समाजकारण व राजकारण केलं. त्यांनी धोम बलकवडी व नागेवाडी धरण उभारून दुष्काळी भागाला पाणी देण्यास अग्रक्रम दिला. त्यांच्याच आदर्श विचारांचा वारसा घेऊन मी काम करेन. महाविकास आघाडीने आपल्या पंचसूत्रीमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यटन विकास तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. मला एकदा संधी द्या मी महिला म्हणून कुठेही कमी पडणार नाही, संधीचे सोन करून दाखवेन.
किरण माने, रमेश धायगुडे- पाटील, दिलीप बाबर, साै. अल्पना यादव, समाधान कदम, दिगंबर गाढवे, ॲड. प्रतापसिंह देशमुख, यशराज भोसले आदींची यावेळी भाषणे झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप बाबर, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पिसाळ, शिवसेना (उबाटा) तालुकाप्रमुख दत्तात्रय इथापे यांनी स्वागत केले. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचलन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.





