Knee Pain: आजकाल गुडघेदुखी ही एक खूप सामान्य समस्या झाली आहे. विशेषतः जिना चढताना, उतरताना़ किंवा बराच वेळ उभं राहिल्यानंतर गुडघ्यात वेदना जाणवतात. ही समस्या फक्त वयोवृद्धांपुरती मर्यादित नसून तरुणांमध्येही वाढताना दिसते. जीवनशैलीतील बदल, वाढलेलं वजन, चुकीची बसण्याची पद्धत किंवा सांध्यांमध्ये सूज यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. गुडघ्यात वेदना किंवा कडकपणा जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात. वय वाढल्यावर सांधे कमकुवत होतात, त्यामुळे चालताना किंवा जिना चढताना त्रास होतो. काही वेळा ही समस्या संधिवात (आर्थ्रायटिस), स्नायू ताण (मसल स्ट्रेन) किंवा सूज यांचेही लक्षण असू शकते. सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यानंतर गुडघे कडक होणे हीसुद्धा सामान्य बाब आहे. कारण त्या वेळी सांध्यांमधील लुब्रिकेशन कमी झालेलं असतं. Knee Pain गुडघेदुखीची सुरुवात झाली असेल, तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. सर्वात सोपा उपाय म्हणजे गरम पाण्याने शेक देणे. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि कडकपणा कमी होतो. दिवसातून एक-दोन वेळा गरम पाण्याची पट्टी लावल्यास आराम मिळू शकतो. Knee Pain तसेच हलका व्यायाम आणि योगही खूप फायदेशीर ठरतो. वज्रासन, पद्मासन यांसारखी योगासनं गुडघ्यांच्या स्नायूंना बळकट करतात आणि लवचिकता वाढवतात. मात्र, हे व्यायाम हळूहळू आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. Knee Pain आहाराचाही गुडघेदुखीवर मोठा परिणाम होतो. आलं आणि हळद यामध्ये नैसर्गिक सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ, जसे की अक्रोड, जवस आणि मासे, हेही सांध्यांसाठी उपयुक्त असतात. वजन नियंत्रणात ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. कारण जास्त वजनामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव येतो आणि वेदना वाढतात. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून वजन कमी ठेवणे गरजेचे आहे. जर वेळेवर हे उपाय केले, तर गुडघेदुखी आणि सूज दोन्ही कमी होऊ शकतात. त्यामुळे दैनंदिन कामे सहजपणे करता येतात. मात्र, जर वेदना सतत वाढत असतील किंवा सूज जास्त असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. एकंदरीत, योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि साधे घरगुती उपाय यामुळे गुडघेदुखीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.