KKR vs LSG Shardul Thakur bowls 11 ball in a over : आयपीएल २०२५ च्या २१ व्या सामन्यात यजमान केकेआर आणि एलएसजी आले होते. या रोमांचक सामन्याच्या शेवटच्या षटकात एलएसजीने केकेआरवर अवघ्या ४ धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गडी गमावून २३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला २३४ धावाच करता आल्या. दरम्यान या सामन्यात शार्दुल ठाकुरने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शार्दुल ठाकूरने केला लाजिरवाणा विक्रम – १२ षटकांच्या अखेरीस केकेआरने १४९ धावा केल्या होत्या. यानंतर, १३ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजी करायला आला आणि मग असे काही घडले जे क्रिकेट सामन्यात क्वचितच पाहायला मिळते. शार्दुल ठाकूर त्याच्या षटकाची सुरुवात वाईड चेंडूने केली. एका षटकात एक किंवा दोन वाईड चेंडू टाकणे सामान्य आहे, पण शार्दुलने या षटकात अनेक वाईड चेंडू टाकले. पहिल्या चेंडूनंतर दुसरा चेंडूही वाईड झाला. तिसरा चेंडूही वाईड गेला. शार्दुलने तिन्ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले. एका षटकात सर्वाधिक ५ वाईड टाकणारा शार्दुल ठरला दुसरा गोलंदाज- यादरम्यान लखनौचा कर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत त्याच्या स्टार गोलंदाजाच्या या कृतीने खूप निराश दिसत होता. शार्दुल इथेच थांबला नाही आणि त्याने पुढचे दोन चेंडूही वाईड टाकले. अशाप्रकारे, लखनौच्या गोलंदाजाने एका षटकात सलग ५ वाईड चेंडू टाकण्याचे लज्जास्पद कृत्य केले. आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक ५ वाईड टाकणारा शार्दुल दुसरा गोलंदाज ठरला. याआधी आयपीएल २०२३ मध्ये, आरसीबीकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने मुंबईविरुद्ध एका षटकात ५ वाईड चेंडू टाकले होते. हेही वाचा – PBKS vs CSK : प्रियांश आर्यने रचला इतिहास! पहिल्या चेंडूवर षटकार अन् ३९ चेंडूत झळकावलं शतक शेवटच्या चेंडूवर घेतली विकेट्स – सलग ५ वाईड चेंडू टाकल्यानंतर शार्दुल ठाकूरने पहिला वैध चेंडू टाकला. त्याने पुढच्या ५ चेंडूत ८ धावा दिल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. मात्र, त्याने शेवटच्या चेंडूवर शानदार पुनरागमन केले आणि कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करून सर्वांची तोंडे बंद केली. ठाकूरने या षटकात १३ धावा देत १ विकेट्स घेतली. अजिंक्य रहाणे ३५ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. रहाणे बाद होताच केकेआर संघावर दबाव आला आणि त्यानंतर सातत्याने विकेट्स पडू लागल्या.