Sourabh Dubey : आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरचा मोठा निर्णय! आकाश दीपच्या जागी विदर्भाच्या ‘या’ युवा खेळाडूला दिली संधी
Sourabh Dubey : दोन प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने केकेआरला मोठा धक्का बसला आहे.

KKR Replacement Sourabh Dubey IPL 2026 : आयपीएल २०२६ चा १९ वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघातील दोन प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने केकेआरला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या संकटात संघाने एका खेळाडूच्या बदलीची घोषणा केली आहे.
आयपीएल २०२६ च्या २८ मार्चपासून होणाऱ्या रणधुमाळीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढले आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि हर्षित राणा हे दोघेही दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामाला मुकणार आहेत. आकाश दीपच्या जागी केकेआरने विदर्भाचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे याला संघात सामील करून घेतले आहे.
कोण आहे सौरभ दुबे?
२८ वर्षीय सौरभ दुबे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करतो. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात होता, परंतु दुखापतीमुळे त्याला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. सौरभने आतापर्यंत ८ लिस्ट-ए आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात ३० लाख रुपये बेस प्राईस असलेला सौरभ ‘अनसोल्ड’ राहिला होता, मात्र आता त्याला नशिबाने संधी मिळाली आहे.
🚨 BREAKING 🚨
Kolkata Knight Riders sign Saurabh Dubey as a replacement for Akash Deep. 🟣🏏
(Source : Cricbuzz)#IPL2026 #KKR pic.twitter.com/6vw1WJB1Zs
— Game Changers (@Game_Changerrs) March 22, 2026
तज्ज्ञांकडून कौतुकाचा वर्षाव –
माजी राष्ट्रीय निवडकर्ते सुब्रोतो बॅनर्जी यांनी सौरभ दुबेच्या निवडीचे स्वागत केले आहे. “सौरभ हा अतिशय प्रतिभावान डावखुरा गोलंदाज आहे. तो चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करू शकतो. २०१९ मध्ये राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तो इमर्जिंग आशिया कपसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. केकेआरने त्याला संघात घेऊन उत्तम निर्णय घेतला आहे,” असे बॅनर्जी यांनी नमूद केले.
हर्षित राणाचा ‘परफेक्ट’ रिप्लेसमेंट मिळेना –
आकाश दीपची जागा सौरभ दुबेने घेतली असली तरी, हर्षित राणाच्या बदली खेळाडूबाबत केकेआरने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हर्षित राणा हा संघाचा मुख्य गोलंदाज होता, त्यामुळे त्याच्या तोडीचा खेळाडू शोधणे केकेआर व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. हर्षितच्या जागेसाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.





