Kite Thread Accident – “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” या म्हणीचा प्रत्यय रविवार, दि. २५ रोजी निरगुडसर गावचे उपसरपंच भाऊसाहेब फकीरा वळसे यांच्यासह अन्य वाहनचालकांना आला. रस्त्यात अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यामुळे अनेक वाहनचालकांना या दोऱ्याचा फटका बसून किरकोळ अपघात झाल्याची घटना अवसरी खुर्द येथील कौली मळा परिसरातील महानुभव आश्रमाजवळ घडली. रविवार दुपारी साडेअकराच्या सुमारास उपसरपंच भाऊसाहेब वळसे हे आपल्या दुचाकीवरून अवसरी बाजूकडून मंचरकडे जात होते. अवसरी खुर्द हद्दीत कौली मळा येथील महानुभव आश्रमाजवळील मोठ्या झाडावर पतंगाचा जाड दोरा अडकलेला होता. हा दोरा रस्त्यावर लोंबकळत असल्याने वाहनचालकांना तो सहजपणे दिसून येत नव्हता. याच दरम्यान भाऊसाहेब वळसे यांना अचानक फोन आल्याने त्यांनी आपले वाहन सावकाश करत रस्त्याच्या कडेला घेतले. त्याच वेळी त्यांच्या गळ्याभोवती पतंगाचा दोरा अडकला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी वाहन तात्काळ थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. दोरा त्यांच्या गळ्याला घासला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भाऊसाहेब वळसे यांच्या मागून येणाऱ्या सारस जारकड या तरुणाला रस्त्यातील दोरा लक्षात न आल्याने तो दोरा त्याला लागला. गोंधळात त्याचे वाहन घसरून तो खाली पडला व त्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्या मागून येणाऱ्या आणखी दोन ते तीन वाहनचालकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तात्काळ आपली वाहने थांबविल्याने पुढील मोठा अपघात टळला. या वाहनचालकांनी तात्काळ रस्त्यातच उभे राहून पतंगाचा दोरा बाजूला काढण्यास सुरुवात केली. जखमी तरुण सारस याला दोऱ्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करत मोठ्या प्रमाणावर अडकलेला दोरा गोळा करून बाजूला फेकण्यात आला. मात्र दोरा गोळा करत असताना एका वाहनचालकाच्या हाताला दोऱ्याने कापले गेले असून त्याला किरकोळ जखम झाली आहे. पालकांनी दक्ष राहावे सध्या सर्वत्र पतंग उडवण्याचा मौसम सुरू असून मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जात आहेत. मात्र, कट झालेली किंवा सोडून दिलेली पतंग व त्यांचा दोरा तसेच मांजा रस्त्यावर, झाडांवर अडकून राहतो.त्यामुळे नागरिकांनी रस्त्याने जाताना सावधपणे जावे, असे आवाहन माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांनी केले आहे.