Kishori Pednekar। किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा; बॉडी बॅग खरेदी कथित घोटाळा प्रकरण

Kishori Pednekar। करोना काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर २२ फेब्रुवारी पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोर पेडणेकर या करोना काळात मुंबई महानगरपालिकेत महापौर होत्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
यातीलच बॉडी बॅग प्रकरणातील घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला २२ फेब्रुवारीपर्यंत वाढ देण्यात आली आहे. नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने दिलेला दिलासा मुंबई न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांना अटक झाल्यास त्यांना तीस हजाराच्या जामीनावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.





