‘देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत…’ संत तुकारामांची पालखी सजवणाऱ्या मुस्लिम बांधवांबाबत किरण मानेंची खास पोस्ट

देहू– मागील काही दिवसांपासून हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ वाढत चालल्याचे दिसते. कोल्हापूर आणि नगरमध्ये झालेले आंदोलन हे त्याचे उदाहरण आहे. तर आधी त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे मुस्लिम बांधवांनी धूप जाळला म्हणून मोठा वाद निर्माण झाला होता. यादरम्यान अभिनेता किरण माने यांनी संत तुकारामांची पालखीबाबत एक पोस्ट शेअर करत हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
किरण माने यांनी त्यांच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर संत तुकारामांची पालखीला चकाकी देणाऱ्या मुस्लिम बांधवांचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने लिहिले की, ‘ तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी !
देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हननं हाय.
View this post on Instagram
रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो. आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय !’ सध्या त्यांच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.





