Pune Gramin : किरण गुजर यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार प्रदान

बारामती : बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांना बालगंधर्व रंगमंदीरात ‘बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार’ देवुन सन्मानित करण्यत आले. बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय नागरीक विमानवाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते गुजर यांना पुरस्कार देण्यात आला.
बारामतीत नाट्य व सांस्कृित क्षेत्रात गुजर हे गेल्या ४५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या नाट्य, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत पुणे बालगंधर्व परिवाराच्या वतीने या सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी राज्यभरातील विविध नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ कलाकार व कलावंत उपस्थित होते.
त्यांच्या नटराज नाट्य कला मंडळाने आतापर्यंत ४९ नाटकांची निर्मिती केली असून, १९८१ पासून सलगपणे पारितोषिके मिळवत त्यांनी आपल्या नाट्य संस्थेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच गुजर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. १९९५ आणि २०१२ या वर्षांमध्ये बारामती येथे दोन भव्य दिव्य नाट्य संमेलनांचे यशस्वी आयोजनही त्यांनी केले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर नाट्य गौरव, कला गौरव आणि जीवन गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय, राज्यभरातील कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.बारामतीत स्वस्त नाटक योजना, लावणी महोत्सव, ज्येष्ठ कलावंत गौरव सोहळे, नाट्य व नृत्य प्रशिक्षण शिबिरे, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, बारामती गणेश फेस्टिवल आदी उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
या पुरस्काराबाबत किरण गुजर म्हणाले, पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या कार्याला एक मोठा सन्मान प्राप्त झाला असून, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हे निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. माझे वडील स्व. बबनराव गुजर यांची ५३ वी पुण्यतिथीच्या दिवशीच बालगंधर्व परिवार यांनी माझा पुरस्कार देऊन सन्मान केला. हा सन्मान माझा नसून सर्व बारामतीकरांचा आहे. ४५ वर्ष अखंड साथ देत असलेल्या नटराज परिवाराचा असल्याचे गुजर म्हणाले.





