Nagar | आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य

पारनेर, (प्रतिनिधी) – शहरात दोन ते तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्याने पारनेर शहरातील आठवडी बाजारात चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्राहक व विक्रेते त्रस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या पावसाळा असल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. पारनेर नगर पंचायतीने बाजारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे.
दर रविवारी पारनेर शहरातील आठवडी बाजार भरला जातो. परिसरातील बारा ते तेरा वाड्या व वस्त्यावरील शेकडो नागरिक भाजीपाला खरेदी व विक्री करण्यासाठी या आठवडी बाजारात येत असतात.
बाजारात आलेल्या ग्राहकांना या चिखलाचा सामना करावा लागतो.नागरिकांच्या या समस्यांबाबत पारनेर नगर पंचायत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
नगर पंचायत प्रशासनाकडून बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणलेल्या मालावर कर वसूल केला जातो पण त्यांना बाजारात प्राथमिक नागरी सुविधा देण्यास नगर पंचायत प्रशासन असमर्थ ठरत आहे.
पारनेर नगर पंचायत स्वच्छता विभागाने व सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन बाजारातील चिखल समस्या दूर करण्यासाठी संपूर्ण बाजारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.
आठवडी बाजारातील चिखलाची समस्या कायम सोडवून रस्ता काॅंक्रीटीकरण करण्यात यावा. भाजीपाला विक्रेते यांना कायमस्वरूपी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात यावी. किरण सोनवणे. तालुकाध्यक्ष. आरपीआय, आंबेडकर गट





